नमामि गोदा, आयटी पार्क प्रकल्पाला गती द्या : खासदार गोडसे

नाशिक : नमामि गोदा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, शहरात आयटी पार्क प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, तसेच शहरातील रिंगरोड, प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी तातडीने अंमलजावणी सुरू करण्यात यावी यांसह विविध विकासकामांबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेत चर्चा केली.

यावेळी खा. गोडसे यांनी शहरातील विविध समस्या व विकासकामांविषयी सविस्तर चर्चा केली. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे अनेक अपघात होत असल्याने शहरवासियांची मोठी कुचंबना होत आहे. गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी तातडीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मखमलाबाद शिवारातील ग्रीनफिल्ड प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी करतानाच शहरात आयटी पार्क उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याबाबत संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.