नाशिक जिलहापरिषदेची गट, गण रचना आज होणार जाहीर

प्रारुप आराखड्यावर हरकतींसाठी 8 जूनपर्यंत मुदत

ZP_Nashik

नाशिक : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची फेररचना झाली असून, त्याचा प्रारुप आराखडा जिल्हाधिकारी गुरुवार  रोजी जाहीर करणार आहेत. या आराखड्यावर मतदारांना हरकती नोंदवण्यासाठी 8 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात 4 मे रोजी झालेल्या सुनावणीत दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्व तयारीला वेग आला. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2022 मध्ये राबवलेला गट-गण प्रारुप आराखडा कार्यक्रम रद्द करत, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारुप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. यात आता गट-गणांचे प्रारुप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २३  मे रोजी जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचना तयार करून विभागीय आयुक्तांना सादर करणे क्रमप्राप्त होते. मात्र, हा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून वेळात सादर न होता २५  मे रोजी सादर झाला. २६  ते ३१  मे दरम्यान या प्राप्त आराखडयाच्या पडताळणी झाली असून, काही तांत्रिक दुरूस्त्या करत विभागीय आयुक्तांनी या प्रारूप आराखडयास मान्यता दिली आहे. मान्यता दिलेला आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे ३१  मे रोजी उशीराने दाखल झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून गुरूवारी हा प्रारूप आराखडा सर्वसामान्य व्यक्तींसाठी प्रसिध्द केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासह, तालुकास्तरावर तहसिल कचेरी, पंचायत समितीस्तरावरदेखील हा आराखडा लावण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ८४  गटांचे आणि १५  पंचायत समित्यांच्या १६८  गणांचा प्रारुप आराखड्यास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झालेला हा प्रारूप आराखडा गुरूवारी  प्रसिध्द होणार आहे. त्यावर ८  जूनपर्यंत मतदारांना हरकती नोंदवता येतील. प्रारुप आराखड्यावरील हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांचा प्रारुप आराखडा 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर केला जाईल. त्यावर हरकती व सूचना 8 जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जातील. एकूण प्राप्त हरकतींवर योग्यवेळी सुनावणी घेवून त्या निकाली काढल्या जातील.
– स्वाती थवील, उपजिल्हाधिकारी