घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी विधानसभेला १४४ जागा लढविणार

राष्ट्रवादी विधानसभेला १४४ जागा लढविणार

Subscribe

दुष्काळ बैठकीत राज्यातील समीकरणांवर प्रकाशझोत; लोकसभेला १० ते १३ जागांची अपेक्षा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा बसण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रवादीने राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बोलवलेल्या बैठकीत येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकांवर चर्चा झाली. विधानसभेसाठी आघाडी कायम राहणार असून राष्ट्रवादी १४४ जागा लढवणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडल्यामुळे आता पंधरा दिवसांनी होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक घेतली. दुष्काळावर नाशिकचे दोन पदाधिकारी बोलले. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी एका पदाधिकार्‍याने आपले मत मांडले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीवर भाष्य करत लवकरात लवकर उमेदवार घोषित करण्याची मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. उमेदवार निश्चित झाल्यास त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. लोकसभा निवडणुकीत अखेरपर्यंत जागा वाटपात वेळ वाया गेल्याने पक्षाच्या जागा घटल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’ येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळावर उपाय योजना सूचवत पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी निवडणुकांचा आढावा सादर केला. लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी नेत्यांनी पक्षाशी गद्दारी केली. मात्र, प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे लोकसभेच्या १० ते १३ जागा राष्ट्रवादीला मिळतील, असा अंदाज या बैठकीत वर्तवण्यात आला. या निकालाचा चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

जिल्हानिहाय आढावा

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा लोकसभेचे समीकरण जुळवले जाणार आहे. मोदींना स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर इतर पक्षांची सांगड घालून भाजप विरहित सरकार स्थापन्याचा प्रयत्न पवार करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या घडामोडींसाठी साधारणत: एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर जिल्हानिहाय आढावा घेऊन उमेदवार निश्चित केले जातील.

उमेदवार बदलणार?

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील डेंजर झोनमधील उमेदवार बदलण्याचे संकेत पक्षाकडून मिळाले आहेत. विद्यमान आमदारांना सक्षम पर्याय कोण ठरणार, याविषयी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पवार स्वत: चाचपणी करणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षांना आता धुमारे फुटले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -