घरमहाराष्ट्रनाशिकना वाहनचालकांना शिस्त, ना पोलिसांची दक्षता; रस्ता सुरक्षेचे तीनतेरा

ना वाहनचालकांना शिस्त, ना पोलिसांची दक्षता; रस्ता सुरक्षेचे तीनतेरा

Subscribe

स्वप्निल येवले । पंचवटी

औरंगाबाद रोडवरील बस दुर्घटनेनंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असल्या तरीही बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न काही सुटलेला नाही. विशेष म्हणजे घटनास्थळी तैनात पोलिसही बेशिस्त वाहनचालकांकडे डोळेझाक करत केवळ ड्युटी बजावत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

पंचवटीसह शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस व महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे. परंतु, वाहनचालक सिग्नल न पाळताच नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे जीवघेणे अपघात व वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच बनला आहे. असे असतानाही पोलीस यंत्रणा मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.
औरंगाबाद रोडवरील बस दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहते. जीवघेणे अपघात रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. खुद्द पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. मात्र, रस्त्यावर तैनात पोलिसांना जराही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील अपघातस्थळांसह शहरातील चौकाचौकांत वाहनचालकांकडून सिग्नल्सचे उल्लंघन सुरू आहे. अनेक चौकांत पोलीस तैनात असूनही ते बेशिस्त वाहनचालकांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे बेशिस्त वाहनचालक अधिक निर्धास्त झाले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांसोबतच महापालिकेच्या सिटी लिंक बसचे चालकदेखील सिग्नल मोडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून आले. अनेकदा वाहनचालकांनी सिग्नल मोडणार्‍या बसचालकांना हटकले असता त्यांची अरेरावीची भाषा ऐकावी लागली. पालिकेच्या सिटीलिंक बसचालकांकडूनच नियमभंग होत असेल तर सामान्य नागरिकांनी काय आदर्श घ्यावा, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सर्वसामान्य नाशिककरांवर जशी दंडात्मक कारवाई करतात, तशीच कारवाई सिटी लिंक बसवरदेखील करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

पंचवटीतील मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल चौफुली, पेठ फाटा, शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, राऊ हॉटेल चौफुली, आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप, नागजी चौफुली, आनंदवली चौक या चौकात बसवण्यात आलेले सिग्नल नावापुरताच असल्याचे दिसते. याठिकाणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. बेशिस्त वाहनचालक व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी मखमलाबाद नाका, पेठ फाटा, दिंडोरी नाका, निमाणी, आरटीओ कॉर्नर, ड्रीम कॅस्टल आदी भागात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ड्युटीवर असतात तरी कुठे हा नागरिकांना प्रश्न पडला आहे. जे नाशिककर सिग्नल आणि वाहतूकीचे नियम पाळत नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

एकेरी मार्गांवर नियमांचे उल्लंघन

रेडक्रॉस सिग्नल ते रविवार कारंजा आणि रविवार कारंजा ते अशोकस्तंभ एकेरी मार्ग आहे. मात्र, या मार्गांवर बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने व भरधाव वेगात वाहने चालवतात. रविवार कारंजा येथे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी ड्युटीवर असतानाही ते बघ्याची भूमिका घेतात. शिवाय, ते यशवंत मंडई किंवा गणपती मंदिराजवळ सावलीत बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीला शिस्त कधी लागेल, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

मालेगाव स्टॅण्डवर पोलिसांची बघ्याची भूमिका

मालेगांव स्टँड परिसरात पोलीस चौकी असतानाही पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत. पोलीस रस्त्यावर असले तरी त्यांच्यासमोर नियमांचे उल्लंघन होते. ते मात्र वाहनचालकांवर कृपा करतात. अनेकदा वाहतूक कोंडी झालेली असतानाही चौकीतील कर्मचारी बाहेर येण्याचीही तसदी घेत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -