सराफ बाजारात सोमवारी नो व्हेइकल डे

संत नरहरी पुण्यतिथीनिमित्त सराफ असोसिएशनचा उपक्रम

सराफ बाजारातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण जनजागृतीसाठी सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि नाशिक सराफ असोसिएशकडून सोमवारी (दि.१ मार्च) ‘नो व्हेइकल डे’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सराफ असोसिएशनने पहिल्यांदाच उपक्रम राबविणार असल्याने त्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

दि नाशिक सराफ असोसिएशनचे चारशेवर सभासद आहेत. त्यापैकी जवळपास साडेतीनशे सदस्यांची दुकाने सराफ बाजारात आहे. या पेढ्यांतून किमान एक हजाराच्या आसपास कर्मचारी काम करतात. दागिने घडविणारे ५०० ते ६०० बंगाली कारागीर देखील येथे आहेत. त्यापैकी बहुतांश लोक दुचाकीने बाजारात येतात. दिवसभर ग्राहक व इतर ठिकाणाहून येणारे व्यापारी यांची सगळ्यांची वाहने बाजारात येतात. त्यातून वाहन पार्किगची मोठी समस्या निर्माण होत आहे. ‘नो व्हेइकल डे उपक्रमातून वाहतूक समस्येत किती सुटते, याची असोसिएशनकडून पाहणी केली जाणार आहे.
१ मार्च रोजी दैनंदिन व्यवहारासाठी सराफ बाजारात येताना सायकल, पायी किंवा अगदीच शक्य होत नसल्यास कोवीड नियमावली पाळून शेअर रिक्षा, शेअर टू व्हिलर किंवा आपल्या रूटवर राहत असलेल्या सराफ बांधवांना लिफ्ट द्यावी. या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन असे आवाहन अध्यक्ष गिरीश नवसे, उपाध्यक्ष मेहूल थोरात, सेक्रेटरी किशोर वडनेरे, प्रमोद चोकसी, योगेश दंडगव्हाळ आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

सराफ बाजारात सोमवारी सराफी व्यावसायिक आणि त्यांच्याकडील कामगार, कारागीरांनी बाजारात पायी, सायकल किंवा शेअर रिक्षाव्दारे पोहोचणार आहेत. नो व्हेइकल डे उपक्रम यशस्वी झाल्यास १५ दिवसांतून एकदा अशा स्वरुपाचा उपक्रम राबविला जाणार आहे.
गिरीश नवसे अध्यक्ष, सराफ असोसिएशन