Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक बापरे ! छोटा भीम बनून त्याने मारली चक्क सापावर उडी

बापरे ! छोटा भीम बनून त्याने मारली चक्क सापावर उडी

कोविड सुट्यांचे दुष्परिणाम; कार्टूनच्या आहारी गेलेल्या मुलाचा ‘प्रताप’

Related Story

- Advertisement -

कोविडच्या सुटीकाळामुळे लहान मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमालीचा वाढला असून त्यात विशेषत: टिव्हीवर कार्टून बघण्यावर भर दिली जात आहे. अधिकाधिक काळ हे कार्टुन्स बघितले जात असल्याने मुलांच्या मेंदूवरच जणू या कार्टून्सच्या कॅरक्टर्सने ताबा मिळवला आहे. छोटा भीम कार्टूनने प्रभावित झालेल्या एका चार वर्षीय बालकाने रस्ता ओलंडणार्‍या सापावरच उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशकातील तारवाला नगर परिसरात घडला. सुदैवाने या घटनेत बालक आणि साप हे दोघे बचावले. मात्र यामुळे मुले कार्टून्सच्या किती आहारी गेले हे स्पष्ट झाले.

कोविडमुळे आता ऑनलाईन शिक्षणावरच जोर दिला जात आहे. परिणामी मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. विशेषत: ज्या मुलांचे आई – वडील दोघेही नोकरी करतात, त्या मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ अधिक वाढल्याचे दिसून येते. तसेच वडील नोकरीवर गेल्यावर आई घरकामात व्यस्त असते. अशा वेळी मुलांकडे दिवसभर लक्ष द्यायला आईला सवडच नसते. अशावेळी पर्याय म्हणून मुलांना कार्टून लावून देत टिव्हीसमोर बसवले जाते. अथवा मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यात कार्टून लावून दिले जाते. दोन-अडीच वर्षांच्या आतील मुलांच्या आयांसाठी कार्टून सीरियल टीव्हीवर लावणे आणि मग त्यांना खाऊ घालणे हा रोजचा ‘सोहळाच’ बनललेला असतो. अगदी त्या पुढच्या वयोगटातल्या मुलांचेही कार्टून्स हेच भावविश्व बनलेले असते. त्यातून आता मुले कार्टून्सचे अनुकरण करायला लागले आहे. याचा फटका तारवालानगर येथील कुटुंबाला बसला. या कुटुंबातील पती-पत्नी नोकरी करतात. त्यामुळे दिवसभर मुलगा आणि त्याची आजीच घरी असते. आजीला वयोमानानुसार फार धावपळ करता येत नसल्याने मुलाला दिवसभर टिव्हीवर कार्टून लावून दिले जाते. त्यात विशेषत: छोटा भीम हा कार्टून शो मुलाला अधिक आवडतो. तो सातत्याने छोटा भीमचे अनुकरण करतो. यामुळे तो काही महिन्यात चांगली हिंदी बोलायला लागला आहे. मात्र कार्टूनचे मुलगा करत असलेले अनुकरण या कुटुंबाला चांगलेच महागात पडले.

काय घडले त्या दिवशी?

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी छोटा भीम या कार्टून मालिकेत छोटा भीम एका सापाशी लढाई करतो असे दाखवण्यात आले. हा भाग घरातील लहानग्याने अतिशन मन लावून बघितला. त्यानंतर घरातील दोरीचा साप करुन त्याच्यावर उड्या मारणे, हातात गरगर फिरवणे सारखी कृती तो करु लागला. त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास आजीचा बोट धरुन उद्यानात जात असताना अचानक त्याला तीन फूट अंतरावरच एक खरा साप रस्ता ओलांडताना दिसला. त्याने आजीच्या हाताला हिसका देत चक्क सापावर उडी घेतली. क्षणार्धात तो सापाच्या तोंडावर पाय ठेऊन उभा राहिला. आजीने त्याला पुढे पळण्याचा पोटतिडकीने सल्ला दिला. मात्र तो पायाखाली धरलेल्या सापाशी खेळू लागला. सापाचे तोंड दाबले गेल्याने तो चावा घेऊ शकला नाही. काही वेळात एका तरुणाने या लहानग्याला उचलून घेत सापाची मुक्तता केली. हा साप जखमी अवस्थेत पळून गेला. त्यानंतर मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोठेही डंख नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मुलांंची अशी होऊ शकते कार्टूनपासून मुक्तता

  • सकाळी उठल्यावर मुलांना व्यायाम करायला सांगावा.
  • ते योगासने, प्राणायम करु शकतात.
  • मुलांना सायंकाळच्या सुमारास सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन खेळण्यास मुभा द्यावी.
  • कुटुंबातील प्रत्येक सदस्याने अधिकाधिक वेळ मुलांशी संवाद साधावा.
  • चित्रकला, नाच, क्राफ्ट असे अनेक छंद जोपासता येतात.
  • स्मार्ट फोनचा वापर कार्टूनऐवजी अशा गोष्टींसाठी करावा.
  • स्वयंपाकघरातील नवनवीन गोष्टी योग्य काळजी घेऊन शिकवाव्यात इनडोअर गेम खेळण्यावर भर द्यावा वाचनाची गोडी वाढवावी
- Advertisement -