घरताज्या घडामोडीपोस्ट कार्यालयातील तिजोरी चोरटा अटकेत

पोस्ट कार्यालयातील तिजोरी चोरटा अटकेत

Subscribe

गुन्हे शाखा पथकाची कारवाई, महागडे मोबाईल, गुन्ह्यात दुचाकी हस्तगत

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पोस्ट कार्यालयातील लोखंडी तिजोरी चोरट्यांनी उचलून नेली होती. मात्र, ती फोडता न आल्याने चिल्हारपाडा शिवारात एका नाल्यात फेकून चोरटे पसार झाले होते. कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी गुन्हे शाखेच्या पथकामार्फत तपासचक्र फिरवत चोरट्यास गजाआड केले. अल्पावधीत ही कारवाई केल्याने टपाल अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकांनी पोलीस प्रशासनाप्रति समाधान व्यक्त केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना चोरट्यांचा तपास करुन तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट होता. याची दखल घेत गुन्हा शाखेचे पथक तीन दिवसापासून शहरात तळ ठोकून होते. यानुसार गेल्या वर्षी मोबाईल चोरी प्रकरणातील सराईत कमलाकर दता पवार (21, रा. सुरगाणा) यास संशयावरून ताब्यात घेण्यासाठी पथक गेले असता त्याने धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी पाच किमी सिनेस्टाइल पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिसी खाक्या दखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच महागडे मोबाईल, 20 हून अधिक वेगवेगळ्या कंपन्याचे सीमकार्ड, गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी (क्र. एमएच-15,जीझेड 6843) असा 73 हजारांचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात कमलाकर पवारसह चार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एक अल्पवयीन आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. शिंपी, रामभाऊ मुंडे, पो. हवालदार हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, जयवंत सूर्यवंशी, वसंतराव खांडवी, गृहरक्षक दलाचे जवान शांताराम देशमुख, दिनकर धूम, स्थानिक पोलीस हेमंत भालेराव, जोपळे आदींनी कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सहायक पोलीस निरीक्षक बोडके करीत आहेत.

- Advertisement -

शहरात होणार्‍या चोर्‍या, घरफोड्या रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते. मात्र, सुरगाणा शहरातून चौकशीसाठी संशयित म्हणून जरी एखाद्याला ताब्यात घेतले तरी अनेकजण सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी शासकीय कामात अडथळा आणतात. जबरदस्तीने चौकशीकरीता का ताब्यात घेतात, त्याने गुन्हा केला नाही अशी शिफारस राजकीय मान्यवरांकडून केली जाते. अप्रत्यक्षरित्या चोराला पाठबळ दिले जाते. शासकीय कामात अडथळा आणून पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातो. त्यामुळेच चोरांना पाठबळ मिळते. असे न करता तपास कामी पोलीस यंत्रणेला सहकार्य केल्यास निश्चितच शहरातील चोर्‍यांना कायमस्वरुपी आळा बसणार.
– एस. एस.शिंपी, सहायक पोलीस निरीक्षक, (गुन्हे शाखा, ग्रामीण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -