घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलम्पी संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावा

लम्पी संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावा

Subscribe

पिंपळगाव बसवंत : सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गाय व म्हैस या पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव दिसून येत आहे. परंतु, आपल्या तालुक्यात सद्यस्थितीत या रोगाचे संक्रमण झालेली जनावरे आढळून आलेली नाहीत. तरी रोगाचा प्रादूर्भाव संसर्ग होऊ नये, असे आवाहन निफाडचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सुनील अहिरे यांनी केले.

लंपी स्किन डिसीज आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप कराड होते. यावेळी तालुका पशुसवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. सोपान नांदे, सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र सानप, पशुधन विकास अधिकारी डॉ. रविंद्र चांदोरे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास भोर व तालुक्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व खासगी पशुसेवक उपस्थित होते. या बैठकीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, याबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. सोपान नांदे व डॉ. मोटेगावकर यांनी पशुपालकांनी काय काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. लंपी रोगाचा प्रसार डास, चावणार्‍या माशा गोचीड, चिलटे तसेच बाधित जनावरांचा स्पर्श व दूषित चारापाणी यामुळे होतो. म्हणून पशुपालकांनी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. डास, माशा, गोचीड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करून बंदोबस्त करणे, निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत म्हणून औषध लावणे व गोठ्यांमध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी, जनावरांच्या स्थानिक बाजारात नेण्यास प्रतिबंध करणे, चारा कमी खाणार्‍या जनावरांचा तत्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून उपचार करून घ्यावे, बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेश बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, आजारी जनावरांवर विषारी औषधे फवारणी करू नये, असे आवाहन करण्यात आले.

- Advertisement -

डॉ. रवींद्र चांदोरे यांनी या आजाराच्या लक्षणांसंदर्भात मार्गदर्शन केले. अंगावर दहा ते वीस मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीला भरपूर ताप असतो, डोळ्यातून, नाकातून चिकट स्ञाव येतो, चारापाणी खाणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. काही जनावरांच्या पायावर सूज येणे व लंगडणे अशी लक्षणे दिसतात. त्वचेवरील गाठींचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतु पडू नये, यासाठी जखमेवर औषधी मलम लावावा, असे आवाहन करण्यात आले.

लम्पी आजाराची बाधित जनावरे आपल्या गावात आढळून आल्यास पशुपालकांनी/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. : डॉ. राजेंद्र केदार, पशुवैद्यकीय अधिकारी, दावचवाडी

लम्पी आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने लवकरात लवकर लसीकरण उपलब्ध करून प्रादूर्भाव वाढण्याअगोदर लसीकरण पूर्ण करावे. : देवेंद्र काजळे, सदस्य, कारसूळ ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -