घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेच्या आरोग्य विभागात भरतीचा डाव उधळला

महापालिकेच्या आरोग्य विभागात भरतीचा डाव उधळला

Subscribe

वैद्यकीय विभागाने कोरोनाच्या नावाखाली दोनशे सफाई कर्मचार्‍यांची मागच्या दाराने होणारी घुसखोरी महासभेने हाणून पाडली

महापालिकेतील सातशे सफाई कर्मचार्‍यांच्या भरतीचा डाव उधळला असतांनाच, वैद्यकीय विभागाने कोरोनाच्या नावाखाली नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील साफसफाई करण्याच्या नावाखाली दोनशे सफाई कर्मचार्‍यांची मागच्या दाराने होणारी घुसखोरी महासभेने हाणून पाडली आहे. मोघम पद्धतीने केवळ महासभेच्या मान्यतेसाठी हा विषय ठेवणार्‍या वैद्यकीय विभागाला धारेवर धरत, सदस्यांनी कोरोनाच्या नावाखाली महासभा विकू नका असा जाब प्रशासनाला विचारला. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी हा विषय तहकूब केल्याची घोषणा केली.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे कारण देत, वैद्यकीय विभागाने कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच ठेवली आहे. कोव्हिड काळात खरेदी केलेल्या औषधे आणि सोयी-सुविधांचा खर्च वादात असतानाच, वैद्यकीय विभागाने शुक्रवारी झालेल्या महासभेत जादा विषयात विषय आणून महापालिकेत मागच्या दाराने होणारी २०० सफाई कर्मचार्‍यांच्या आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव वादात सापडला आहे. नवीन बिटको रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील स्वच्छतेचे व तेथील देखरेख प्रणालीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने मोघम पद्धतीने महासभेवर ठेवला होता. यात नवीन बिटको रुग्णालयासाठी १५० तर डॉ. हुसेन रुग्णालयासाठी ५० सफाई कर्मचार्‍यांची आउटसोर्सिंगद्वारे भरती करण्याच्या या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला. कोरोना उतरणीला आला असतानाही या ठिकाणी कोरोना रुग्ण जास्त असल्याचा दावा करत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी प्रस्तावाचे समर्थन केले. तसेच तिसर्‍या लाटेची तयारी सुरू असल्याचा दावा केला. परंतु, निविदा न काढताच काम देण्याची घाई, खर्चाचा उल्लेख नसणे आणि आता कोरोना नसतानाही आऊटसोर्सिंगची घाई करण्याच्या वैद्यकीयच्या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला. कोरोनाच्या नावाखाली महापालिका विकू नका असा सवाल शिवाजी गांगुर्डे यांनी केला. त्यामुळे सदस्यांचा विरोध लक्षात येताच, महापौर कुलकर्णी यांनी हा विषय तहकूब ठेवत याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाला दिले. त्यामुळे मागच्या दाराने दोनशे सफाई कर्मचारी घुसवण्याचा वैद्यकीयचा डाव महासभेने हाणून पाडला.

- Advertisement -

विनानिविदा मंजुरीची घाई

हा प्रस्ताव घाईघाईत विभागाने महासभेवर ठेवून मंजूरी घेण्याचा डाव सदस्यांनी हाणून पाडला. या प्रस्तावासाठी ई निविदा पद्धती न राबवताच या विषयाला मंजूरी घेण्याचा डाव विभागाचा होता. परंतु, गुरुमीत बग्गा यांनी यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी निविदा काढली नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. विशेष म्हणजे प्रस्तावात किती खर्च येईल याचाही उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे सविस्तर इस्टिमेट नसतांनाही प्रस्ताव ठेवलाच कसा असा जाब सदस्यांनी विचारला. त्यावर वैद्यकीय अधीक्षक निरुत्तर झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -