पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वीकारला पदभार

नाशिकlजिल्हा ग्रामिण पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी रविवारी (दि.२०) प्रभारी अधीक्षक तथा मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून सकाळी पदभार स्विकारला.

आडगाव पोलीस मुख्यालयात आज सकाळी १० वाजता ही प्रक्रिया पार पडली. घुगे यांनी पाटील यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. तसेच कागदपत्रांवर सह्या करत पदभार पाटील यांच्याकडे सोपवला. यावेळी नाशिकच्या अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, प्रशासनाचे उपअधीक्षक शामकुमार निपुंगे, उपअधीक्षक अरूधंती राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

मावळत्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. त्यांनी गत आठवड्यातच नाशिकचा पदभार मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर त्यांनी अमरावती आयुक्तालयाचा पदभार घेतला. १५ दिवसांपासून पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांकडे सर्व डोळे लावून बसले होते. अखेरीस गुरूवारी अधीक्षकपदाच्या अधिकार्‍यांचे बदल्याचे आदेश गृहमंत्रालयाने काढले होते. नाशिक जिल्ह्याच्या रिक्त झालेल्या अधीक्षकपदी मुंबई येथील राज्य रखीव दलाचे समादेशक सचिन पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
सचिन पाटील यांनी २०११ मध्ये राज्यपालांचे एडीएस म्हणून काम केले आहे. २०१५ मध्ये ठाणे शहर पोलीस उपायुक्त, २०१७ मध्ये मुंबई पोलीस उपायुक्त तर २०१९ पासून आतापर्यंत मुंबई राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून कार्यरत होते. शनिवारी समादेशक पदाचा पदभार देऊन ते सायंकाळीच तत्काळ नाशिकला हजर झाले. रविवार असल्याने ते सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी रविवारी आडगाव मुख्यालयात हजर होत पदभार स्विकारून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.