घरताज्या घडामोडीगऊबाई उन्हवणे यांचा १३ व्या वर्षी सत्याग्रह सहभाग

गऊबाई उन्हवणे यांचा १३ व्या वर्षी सत्याग्रह सहभाग

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास आणि सेवा करण्याचे भाग्य नाशकातील काही जणांना लाभले. गऊबाई उन्हवणे त्यापैकीच एक नाव. दारोदार भटकून, मागून आणलेल्या पिठाच्या भाकरी पत्र्याच्या शेडमध्ये बसून बाबासाहेबांनी त्यांच्यासोबत खालल्या, बाबासाहेबांच्या जेवणाची जबाबदारी अनेकदा गऊबाईंवर आली होती. बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटलेल्या गऊबाईंनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभाग घेतला. दगडफेकीत डोक्याला जबर दुखापत होऊनदेखील त्यांनी पाठ दाखवली नाही. शासकीय कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला. मृत्यूपश्चात सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची अवहेलना थांबविण्यासाठी त्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली. कारावासही भोगावा लागला. मात्र, कौटुंबिक पेन्शनची योजना त्यांनी थेेट पंडित नेहरूंकडून मंजूर करून घेतली.

जुन्या काळची वेठबिगारी, शिक्षण घेतलेल्या गऊबाई त्याकाळी करन्सी चाळीत राहायला होत्या. बाबासाहेबांच्या विचारांनी त्या झपाटून गेल्या होत्या. बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. अवघ्या तेरा वर्षाच्या कोवळ्या वयातच त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांनी उडी घेतली. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राम मंदिराचा ऐतिहासीक सत्याग्रह केला. यात सुमारे पंधरा ते वीस हजार लोक सहभागी झाले होते.

- Advertisement -

महिलांची संख्याही लक्षणीय होती. सत्याग्रहींना खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्याचे काम त्यावेळी गऊबाई करत होत्या. रथास लोकांना हात लावू दिला जात नव्हता, त्यावेळी सखाराम वस्ताद दंगामस्ती करत रथाचा दोर पकडण्यासाठी घुसत असे. नाना चंद्रमोरे, विठ्ठल गोगा यांच्यासारखी तरुण मंडळी त्यावेळी त्यांच्या सोबतीस होती. नाना चंद्रमोरे हे त्यांचे नातलग असल्याने सत्याग्रहातले पंधरा दिवस गऊबाई त्यांच्या आश्रयाला होत्या. सत्याग्रहात तुफान दगडफेक झाली, यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. गंभीर जखमी होऊनही त्या माघारी फिरल्या नाहीत. दगडफेकीत अनेक सत्याग्रही जखमी झाले, लोक सैरावैरा पळू लागले, सीताकुंडात आंघोळी केल्या म्हणून लोकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला गेला. ब्राम्हण लोक सत्याग्रहींवर केरकचरा-घाण टाकत होते. तरीही त्यांनी जागा सोडली नाही. गऊबाई सासुरवाशीन होत्या. आंदोलनातल्या सहभागामुळे कित्येकदा त्यांनी सासूचा मार खालला. मात्र, बाबासाहेबांच्या चळवळीत काम करण्यासाठी नवर्‍याने प्रोत्साहन दिल्यामुळे प्रत्येक आंदोलनात त्या सहभागी होत होत्या. आंदोलनामुळे तेरा दिवसांचा कारावासही त्यांनी भोगला. कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढल्यामुळे येरवड्याच्या तुरुंगामध्ये त्यांना डांबण्यात आले. झोपण्यासाठी अंथरूण-पांघरूण नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्याकाळी अस्पृश्य मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळेत येऊ देत नसत. ती गोष्ट तुकाराम काळे, रणखांबे, दादासाहेब गायकवाड यांनी बाबासाहेबांना सांगितल्यानंतर ‘मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे’ असे बाबासाहेबांनी त्यांना सांगितले. ‘जमिनीत बांबू गाडून त्याच्यावर कपडा टाका, पण मुलांना शिकवा’ असे बाबासाहेबांनी सांगितले. त्या पद्धतीने शाळा सुरू झाली, शाळेसाठी निधी जमविण्याची जबाबदारी गऊबाईंवर टाकण्यात आली. बाबासाहेब भेट देणार असल्याची कल्पना तुकाराम काळे यांच्या पत्नी सोनूबाई यांनी गऊबाईंना दिली. बाबासाहेबांच्या जेवणाची व्यवस्था गऊबाईंना करावयाची होती. त्यावेळी मागून आणलेल्या पिठाच्या भाकरी करण्यात आल्या. त्याच भाकरी बाबासाहेबांनी शेडमध्ये सर्वांसोबत खालल्या. अशा पद्धतीने प्रत्यक्षात गऊबाईंना बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

गऊबाईंनी अनेक आंदोलने केली. त्यापैकीच प्रेस कामगारांसाठी केलेले आंदोलन मैलाचा दगड ठरला. महत्त्वपूर्ण आंदोलनांमुळे केंद्रीय आणि राज्य कर्मचार्‍यांना कौटुंबिक टेन्शनचे कवच प्राप्त झाले. गऊबाई ज्या चाळीत रहात होत्या, त्या चाळीतील एक प्रेस कामगार अचानक आजारी पडले. त्यांची पत्नी अशिक्षित होती, आजारपणातच कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला शासकीय निवासस्थान सोडावे लागले. त्यांच्या फंडात कमी पैसे असल्यामुळे मुलांचे शिक्षण आणि पुढील उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्या पत्नीला पडला. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर ती महिला गऊबाईंकडे आली. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे होणारे हाल हा मोठा सामाजिक प्रश्न मानून यावर तोडगा निघाला पाहिजे, असा निश्चय करून त्यांनी आंदोलन केले. त्यावेळी शासकीय धोरणांमध्ये कौटुंबिक पेन्शनची तरतूद नव्हती.

बाबासाहेबांनी हा कायदा केला, पण त्याला मंजुरी मिळाली नव्हती. प्रेस कामगारांच्या कुटुंबियांसाठी त्यावेळी त्यांनी मोठा संप घडवून आणला. प्रेस कामगारांनी या संपाला पाठिंबा दिला. कामगारांच्या 22 मागण्यांसह अनेक कौटुंबिक समस्यांचे प्रश्न घेऊन बाबासाहेब खेडगीकर यांच्या नेतृत्वाखाली गऊबाई, चंद्राबाई, शनी शिंदे, शांताबाई बागूल यांसह तीस दिवसांचा संप घडवून आणला. तो मोडीत काढण्यासाठी शासनाने कुंभमेळ्यातील नागा साधूंना महिलांच्या समोर पाठविले. त्यावेळी महिलांनी हातात दंडुके घेऊन नागा साधूंना पिटाळून लावले. तोडगा निघत नसल्याने संपाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या मदतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री एन. शिवराज यांना निवेदन दिले. त्यांनी ते तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना देऊन त्यांच्याकडून प्रेस कामगारांच्या हिताच्या 22 मागण्या मंजूर करून घेतल्या. तेव्हापासून कामगारांच्या कुटुंबाचा विचार करून केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांना कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात गऊबाईंचा मोलाचा वाटा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -