घरमहाराष्ट्रनाशिकलोंबकळणार्‍या वीजतारांमध्ये शॉर्टसर्किट; शेतकर्‍याचे हाताशी आलेल पीक जळून खाक

लोंबकळणार्‍या वीजतारांमध्ये शॉर्टसर्किट; शेतकर्‍याचे हाताशी आलेल पीक जळून खाक

Subscribe

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील संदीप रमेश देवरे यांच्या शेतावरील वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होउन लागलेल्या आगीत शेतातील तीस क्विंटल मक्याची कणसे, तीन ट्रॅली चारा जळून खाक झाला. त्यामुळे शेतकर्‍याचे अंदाजे ४२ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

वाजगाव वडाळे रस्त्यावर राहणारे शेतकरी संदीप देवरे यांनी त्यांच्या ३२ गुंठे क्षेत्रात ( गट नं. ५६४ ) असलेल्या मका कापणीचा मक्ता गावातील मजुरांना दहा हजार रूपयांना दिला होता. मजुरांनी सोमवारी शेतातील मका कापणी केली होती. खुडलेली मक्याची कणसे शेतातच पडलेली होती. हया शेतावरून वीज कंपनीच्या वीज वाहक तारा गेलेल्या होत्या. बुधवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजता लोड शेडींगच्या वेळापत्रकानुसार वीज आली व हया लोंबकळणार्‍या तारांवर बसलेले पक्षी उडाल्यामुळे तारांना हेलकावा बसून शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या उडून शेतात पसरलेल्या मक्याच्या चार्‍याने पेट घेतला.

- Advertisement -

आग लागल्यानंतर परीसरातील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु शेतात पसरलेल्या सर्व चार्‍यानेच पेट घेतल्यामुळे आग विझविणे अशक्य होऊन सर्व चारा व मक्याची कणसे जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच सहायक अभियंता जितेंद्र देवरे व त्यांचे सहकार्‍यांनी शेताला भेट देऊन पाहणी केली. तसेच सदर घटनेबाबत इलेक्ट्रिकल अभियंता यांना कळविण्यात आल्याची माहीती देवरे यांनी दिली.तलाठी कुलदिप नरवडे यांनी पीक नुकसानीचा पंचनामा केला आहे. संदीप देवरे यांनी वीज कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. लोंबकळणार्‍या तारांमुळे दरवर्षी शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. वीज कंपनीने हया सदोष तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -