घरताज्या घडामोडीतक्रारदार, साक्षीदाराने माघार घेवूनही आरोपीस शिक्षा

तक्रारदार, साक्षीदाराने माघार घेवूनही आरोपीस शिक्षा

Subscribe

तक्रारदार व साक्षीदारांनी माघार घेतली असतानाही न्यायाधीश एस. टी. पांडे यांनी शुक्रवारी (दि.२८) सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांच्या साक्षी गृहीत धरुन व परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन आरोपीस एक वर्षाकरिता चांगल्या वर्तवणुकीचा १५ हजार रुपयांच्या बॉण्डवर सोडून देण्याची शिक्षा सुनावली. निलेश भाऊसाहेब शिंदे (२०, रा.बोरस्तेवस्ती, ता.दिंडोरी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २७ फेब्रुवारी २०१६ रोजी दिंडोरीतील बसस्थानकासमोर घडली होती.

योगेश बोरस्ते व त्यांचा भाऊ संदीप बोरस्ते हे दिंडोरी रोडवरील बसस्थानकासमोर आले होते. त्यावेळी दोघांची निलेश शिंदे याच्याशी भेट झाली. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. तुला मी जीवंत सोडणार नाही, तुझे तुकडे करुन टाकतो, असे म्हणत निलेश शिंदे यांनी तलवारीने योगेश बोरस्तेच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संदीप बोरस्ते मध्यस्थी झाले असता ते जखमी झाले. याप्रकरणी योगेश बोरस्ते यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी शिंदे यास तलवारीसह अटक केली होती. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी तपास करत त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी तक्रारदार व साक्षीदारांनी माघार घेतली. मात्र, न्यायाधीश पांडे यांनी सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांच्या साक्षी गृहीत धरुन व परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन शिंदे यास शिक्षा सुनावली. खटला सरकारी वकील वाय. डी. कापसे यांनी चालविला. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सैय्यद, पोलीस हवालदार मंगेश वझरे, ज्योती उगले यांनी मदत केली.

- Advertisement -

न्यायालयीन निकाल कामाची पावती

दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बारकाईन तपास केला. सर्व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सुनावणीदरम्यान फिर्यादी व साक्षीदार फितूर झाले असतानाही न्यायालयाने पोलीस व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीस शिक्षा सुनावली ही आमच्या कामाची पावती आहे.
निसार सैय्यद सहायक पोलीस निरीक्षक, नाशिक ग्रामीण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -