घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेत आधीच ‘दुष्काळ’, त्यात अधिकार्‍यांच्या बदल्या

महापालिकेत आधीच ‘दुष्काळ’, त्यात अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

५ महिन्यात १५ अधिकारी निवृत्त; महापालिकेत मोठ्या प्रमाणावर अधिकार्‍यांची ‘चणचण’

महापालिकेत नोकर भरतीला शासनाने लगाम लावलेला असताना जुन्या अधिकार्‍यांच्या सेवानिवृत्तीने प्रशासनाला घाम सोडला आहे. गेल्या पाच महिन्यांत महापालिकेत किमान १५ अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे उर्वरित अधिकार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यातच शासननियुक्त तीन अधिकार्‍यांच्या बुधवारी (ता. २४) बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनावरील संकट अधिक गडद झाले आहे.

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपायुक्त रोहिदास बहिरम, सहाय्यक आयुक्त अशोक वाघ, सहाय्यक लेखा वित्त अधिकारी सुलेखा घोलप हे दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांच्यापूर्वी काही अधिकारी निवृत्त तर काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन महापालिकेतून बाहेर पडले आहेत. यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर अधिकार्‍यांची ‘चणचण’ भासत आहे. सद्यस्थितीत जवळपास सर्वच अधिकार्‍यांना विविध विभागांचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कामाचा हा ताण सहन होत नसल्याने अनेक अधिकारी आता स्वेच्छा निवृत्तीच्या विचारात आहे.

- Advertisement -

डोईफोडे, कुमावत, गायकवाड यांची बदली

अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे सध्या रिक्त आहेत. यातील एक पद तर गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. उपायुक्तांची चार पदे रिक्त आहेत. त्यापैकी एक महेश डोईफोडे वर्षापूर्वीच महापालिकेत रुजू झाले होते. ते आता पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून रुजू होत आहेत. प्रशासन विभागाच्या प्रभारी उपायुक्त सुनीता कुमावत यांची पारनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी तर विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांची इगतपुरी येथे मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. या तीनही अधिकार्‍यांच्या बदल्यांमुळे तिन्ही जागा रिक्त होणार असून, त्या जागेवर शासनाने अद्याप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. महापालिकेतील सहाय्यक आयुक्तपदाची दोन्ही पदे आजमितीस रिक्त आहेत.

तीन दिवसांत अपेक्षा

येत्या दोन तीन दिवसात महापालिकेत तीन ते चार अधिकारी नव्याने रुजू होण्याची शक्यता असली तरी अद्याप त्यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. अतिरिक्त आयुक्त पदासह लेखा विभाग, प्रशासन या पदांसाठी शासनाकडून आदेश निघण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

वित्त विभागाची कामे रखडली

महापालिकेत अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या वित्त विभागाचे मुख्य लेखाधिकारी संदीप शिंदे हे दीर्घ रजेवर आहेत. बदलीच्या मानसिकतेतून ही रजा घेतल्याचे बोलले जाते. यामुळे महापालिकेच्या अर्थ आणि वित्त विभागाची महत्वाची कामे रखडली असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -