घरमहाराष्ट्रनाशिकबाहुबलीचे ‘नेक्स्ट स्टेशन’ वैजापूर?

बाहुबलीचे ‘नेक्स्ट स्टेशन’ वैजापूर?

Subscribe

येवल्यातील बदलत्या रंगावर नव्या पर्यायाचा उतारा

ज्या माणिकराव शिंदे यांनी पायघड्या घालून येवल्यात राजकीय पुनर्वसन करण्यात बिनीची भूमिका बजावली, त्यांच्याकडूनच उमेदवारीची मागणी होऊन अप्रत्यक्ष आव्हान मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बाहुबली नेते छगन भुजबळ यांनी आपली राजकीय वाट बदलण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातील जोखीम लक्षात घेता भुजबळ यांनी मराठवाड्यातील वैजापूर गडाची निवड करून तेथून लढण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात, भुजबळ अथवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतेही सूचक वक्तव्य करण्यात आलेले नसले तरी भुजबळ काका-पुतण्याची छायाचित्रे असलेल्या ‘वैजापूरचे भावी आमदार’ सारख्या पोस्ट्स समाज माध्यमांत फिरू लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

२००४ मध्ये राजकीयदृष्ट्या स्थिरावण्यासाठी भुजबळ यांनी येवल्याची निवड केली होती. येवलेकरांनी भरभरून मतदान केले आणि भुजबळ यांनीही दणकून विकासकामे करीत उतराई होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या राजकीय प्रवासात २००९ चा अपवाद वगळता माणिकराव शिंदे हे सोबत राहिल्याने त्यांना बक्षिसी म्हणून विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भुजबळ यांनी दिल्याचे सांगण्यात येते. खुद्द शिंदे यांनी मध्यंतरी माध्यमांत जाहिरातबाजी करून भुजबळ यांना त्याचे स्मरण करून दिले, शिवाय यंदाची विधानसभेची उमेदवारी आपल्याला देण्याची थेट मागणी केली. शिंदे समर्थकांनीही त्यांच्या उमेदवारीचा लकडा लावल्याने भुजबळ सावध झाले आहेत. बदललेली राजकीय परिस्थिती आणि येवल्यात यंदा ‘अॅन्टी इन्कम्बन्सी फॅक्टर’ चा फटका बसण्यासह प्रबळ झालेल्या शिवसेनेचा जोश बघता भुजबळ यांना शिंदे यांची नाराजी परवडणारी नाही. याच पार्श्वभूमीवर येवल्यालगतच्या वैजापूरमधून भुजबळ यांनी उमेदवारी करण्याची गळ स्थानिक नेत्यांकडून घातली जात आहे.

- Advertisement -

छगन भुजबळ अथवा पुतणे समीर भुजबळ यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी, असा या नेत्यांचा सूर आहे. तशा आग्रही भूमिकेतून निवडक वैजापूरकर भुजबळ यांची भेट घेणार असल्याचीही वंदता आहे. याबाबत भुजबळ यांनी तूर्तास मौन बाळगले असले तरी निवडणूक व्यवस्थापनात तरबेज असलेल्या बाहुबलीकडून चौथ्यांदा येवल्यालाच पसंती दिली जाते की वैजापूरचा गड सर करण्याची संधी मिळवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

समर्थकांकरवी दबावाचे राजकारण ?

येवल्यातील बदलते राजकीय रंग आणि माणिकराव शिंदे यांची उमेदवारीची मागणी लक्षात घेऊन भुजबळ यांनी आपल्यापुढे वैजापूर मतदारसंघाचा पर्याय असल्याचे दर्शवत समर्थकांकरवी दबावाचे राजकारण सुरू केल्याचा सूर आहे. गेल्या पाच वर्षांत येवल्यात शिवसेनेने चांगले बस्तान बसवले आहे. शिवाय, गेल्या निवडणुकीपर्यंत सोबत असलेल्या दराडे बंधूंनी शिवबंधन बांधून आमदारकी पदरात पाडून घेतल्याने त्यांची साथ यावेळी भुजबळ यांना नसणार आहे. स्थानिक नगरपालिकेसह विविध सत्तास्थानेही भुजबळ यांच्या हातातून निसटली आहेत. ही स्थिती लक्षात घेता आपल्याजवळ येवल्याव्यतिरिक्त वैजापूरचा पर्याय असल्याचे दर्शवून भुजबळ राजकीयदृष्ट्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

बाहुबलीचे ‘नेक्स्ट स्टेशन’ वैजापूर?
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -