घरमहाराष्ट्रनाशिक"हम सब एक है" हनुमान जयंती मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

“हम सब एक है” हनुमान जयंती मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Subscribe

मिरवणूक मशिदीजवळ येताच मुस्लिम बांधवांनी स्वागत करत थेट मिरवणुकीत सहभाग घेतला.

नाशिक :  राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनीही सहभागी होत ‘हम सब एक है..’, ‘प्रभू श्री रामचंद्र की जय..’, ‘हनुमानजी की जय’चा जयघोष करत सामाजिक सलोख्याबरोबरच एकतेचे दर्शन घडवले.

या मिरवणुकीत हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. मुस्लिम समाजाचा पवित्र सण असलेला रमजान सुरू असताना राजकीय मंडळींनी मशिदींवर भोंगे काढण्याचे आवाहन करून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापवले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन करताच मनसेच्या वतीने राज्यात भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती.

- Advertisement -

नाशिकमध्ये हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी (दि. १६) सायंकाळी जुने नाशिक येथील वाकडी बारव येथून मिरवणूक काढण्यात आली. जुने नाशिक हा मुस्लिम बहुल म्हणून ओळखला जातो. सध्या रमजान महिना सुरू असल्याने दुधबाजारात सायंकाळच्या वेळी इफ्तारच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी असते. सायंकाळी ७च्या सुमारास नमाज पठणाची वेळ समीप आली असतानाच दुधबाजारातील हेलबावडी मशिद परिसरापर्यंत मिरवणूक पोहचली. त्यामुळे आता तणाव निर्माण होतो की काय, अशी भीतीही काहींकडून व्यक्त करण्यात आली. यादृष्टीने परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात होता.

मिरवणूक मशिदीजवळ येताच मुस्लिम बांधवांनी स्वागत करत थेट मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी हिंदू मुस्लिम भाई भाई, हम सब एक है, भारत माता की जय, सियावर रामचंद्र की जय, जय हनुमान असा जयघोष करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांचा सत्कारही करण्यात आला.

- Advertisement -

महाराजांनीही मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छाही दिल्या. मिरवणुकीत छत्रपती सेनेचे चेतन शेलार, नीलेश शेलार, दिगंबर मोगरे, शिवसेनेचे बाळासाहेब कोकणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सत्यम खंडाळे, हाजी युनुस तांबोळी, जफर शेख, फईम शेख, इम्रान तांबोळी, माजिद पठाण, मुक्तार शेख आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. या मिरवणुकीच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. यामुळे वातावरणातील तणाव निवळला. सत्कारानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -