घरमहाराष्ट्रनाशिकमान्सूनला दीड महिना उलटूनही धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेठाक

मान्सूनला दीड महिना उलटूनही धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेठाक

Subscribe

नऊ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नाले, उपनद्या कोरड्याठाक, संततधारेची प्रतीक्षा

दारणा, मुकणे, भावली आणि वालदेवी धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पाऊस वगळला तर नाशिक जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने नऊ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नाले, उपनद्या कोरड्याठाक झाल्या आहेत. मध्यम प्रकल्प असलेल्या धरणांमध्ये पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडी पडली आहेत.

त्र्यंबक तालुका गंगापूर धरणाचा पाणलोट क्षेत्र आहे. त्याचबरोबर कश्यपी, गौतमी-गोदावरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्र्यंबकच्या पावसाचे पाणी येते. मात्र, दोन दिवसांपासून त्र्यंबकला पावसाने उघडीप दिल्याने धरणामध्ये भर पडण्याचे प्रमाण किंचित होते. इगतपुरीमध्ये आज 7 मिलीमीटर पाऊस झाला होता. तसेच या तालुक्यात जुलै महिन्यात सरासरी 1339 मिलीमीटर पाऊस झाल्याने अजूनही किंचित पाऊस होत असल्याने दारणा धरणातून 350 क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. त्या पाण्याने नांदूरमध्यमेश्वर बंधारा 98 टक्के भरलेला होता.

- Advertisement -

पालखेड धरण समूहातील करंजवण, वाघाड , ओझरखेड आणि पालखेड या धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या दिंडोरी, सुरगाणा, पेठ, आणि कळवणचा पश्चिमेकडील भागात पावसाची दडी आहे. या भागात आज पाऊस झालेला नव्हता. या भागातील खरिपांच्या पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत. येथे पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना चिंता आहे. मात्र, धरणात कमी साठा असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. येवला, नांदगाव, चांदवड, देवळा आणि मालेगावमध्ये कडक ऊन पडत असल्याने पेरणी झालेल्या पिकांना आता पावसाची गरज असल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहे. माणिकपुंज, नागासाक्या, हरणबारी धरणे कोरडी असल्याने आणि गिरणा या मोठया धरणात अवघा 7 टक्के जलसाठा असल्याने पावसाकडे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा

धरणनिहाय साठा

गंगापूर – 54
कश्यपी – 35
गौतमी – 37
आळंदी – 30
पालखेड – 27
करंजवण – 05
वाघाड – 10
ओझरखेड – 03
पुणेगाव – 00
तिसगाव – 00
चणकापुर – 00
हरणबारी – 03
केळझर – 00
नागासाक्या – 00
भोजापूर – 00
गिरणा – 07
पुनद – 05
माणिकपुंज – 00

- Advertisement -

दारणामध्ये 71 टक्केसाठा

इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणात 71 टक्के साठा झाला आहे. तसेच भावली धरण 80 टक्के , मुकणे 23 टक्के वालदेवी 57 टक्के, कडवा 52 टक्के साठा होता. इगतपुरी आणि त्र्यंबकमध्ये पावसाची रिपरिप सलग आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचा वेग कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -