घरमहाराष्ट्रनाशिकनरेंद्र मोदींना प्रवेश नाकारतात तेव्हा...

नरेंद्र मोदींना प्रवेश नाकारतात तेव्हा…

Subscribe

नाशिक दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ अवतरतात... त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी होते... पण...

नाशिक दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ अवतरतात… त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी होते… पण मोदींना घाई असते जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची… खासदार हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा साक्षीदार होण्यासाठी ते घाईगर्दी करतात. पण जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेले पालीस त्यांना प्रवेशव्दारावरच अडवतात. हात जोडून विनंती केल्यानंतरही त्यांना आत सोडले जात नाही… त्यामुळे अखेर मोदी डोक्याला हात मारत माघारी फिरतात. ही घडामोड सोमवारी ८ एप्रिलला घडली. पण त्यातील प्रमुख पात्र हे खरेखुरे मोदी नव्हते तर ते होते प्रती मोदी.

दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनुक्रमे डॉ.भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांनी सोमवारी (ता. ८) उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, भरदुपारी बी. डी. भालेकर मैदानावरून निघालेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत प्रती नरेंद्र मोदी म्हणून ओळख असणारे विकास महंते सहभागी झाले. उमेदवारांच्या गाडीत उभे राहून त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन करत रॅलीचा रोख आपल्या दिशेनी वळवला. कार्यकर्त्यांचा उत्साह देखील दुनावला आणि स्वत: मोदीच अर्ज दाखल करायला आल्याच्या अविभार्वात त्यांनी प्रतिसाद दिला. भालेकर मैदानापासून निघालेली रॅली खडकाळी सिग्नलमार्गे, दुध बाजार, मेनरोडवरून आरके मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. उमेदवारांच्या गर्दीत आपला प्रभाव टिकवून असलेले विकास महंते गाडीतून खाली उतरतात आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचतात. पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात असल्यामुळे व उमेदवारासोबत केवळ पाच जणांना आत जाण्याची परवानगी असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विकास महंते वारंवार विनंती करूनही पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मनधरणी करण्याचे सोडून दिले. पोलिसांची मनधरणी करताना कपाळावर आलेला घाम स्वत:च्या हाताने पूसत महंते कपाळावर हात मारून प्रवेशद्वारापासून अखेर दूर गेले.

- Advertisement -

मोदी फेकच

प्रती मोदींना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. हा बनावट मोदी कोठून आणला काय माहिती? त्यांना पोलिसांनी आतमध्ये सुद्धा आत येऊ दिले नाही, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्यांने व्यक्त केली. त्याच्या मित्राने लागलीच हा मुद्दा खोडून काढला आणि म्हणाला, ‘अरे जाऊ दे रे, हा फेकच मोदी होता. त्याला पोलीस कशाला प्रवेश देतील.’ मित्राची ही प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -