घरमहाराष्ट्रनाशिकचौघांशी लग्न करून फसवणार्‍या तरुणीला मातापित्यांसह अटक

चौघांशी लग्न करून फसवणार्‍या तरुणीला मातापित्यांसह अटक

Subscribe

पैशांच्या लालसेपोटी २२ वर्षीय तरुणीने वेगवेगळ्या भागातील ४ तरूणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक केल्याची घटना मनमाडमध्ये घडली.

पुरुषाने एकापेक्षा जास्त लग्न केल्याच्या अनेक घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. मात्र, २२ वर्षीय तरुणीने पैशांच्या लालसेपोटी वेगवेगळ्या भागातील ४ तरूणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार येथील तरुणाने उघडकीस आणला. पोलिसांनी तरुणीसह तिचे आई, वडील आणि लग्न जुळवून देणारी महिला व पुरुष अशा ५ जणांना अटक केली आहे. या टोळीने आणखी किती तरुणांची फसवणूक केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

मनमाडच्या संभाजीनगर भागात राहणारे अशोक डोंगरे यांचा मुलगा जयेश याच्यासाठी मुलगी शोधत होते. त्याचवेळी त्यांची पुजा भागवत गुळे (रा. अहमदपूर जि.लातूर) या महिलेशी ओळख झाली. तिने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राहणारे माझे ओळखीचे बंडू बेंद्रे असून त्यांची ज्योती नावाची मुलगी आहे. मुलगी सुशिक्षित व सुंदर आहे. मात्र, बेंद्रे कुटुंबीय गरीब असल्याने त्यांच्याकडे लग्न करण्यासाठी पैसे नाहीत. सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल. शिवाय त्यांची मदत करण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागेल, असेही सांगितले. त्यानंतर डोंगरे दांपत्य मुलगा जयेशला सोबत घेऊन अहमदपूरला गेले. त्यांना मुलगी पसंत पडल्यानंतर जयेश व ज्योतीचा १२ मे रोजी लग्न सोहळा पार पडला. लग्नाअगोदर डोंगरे यांनी ज्योतीच्या आई-वडिलांना ४० हजार रुपये रोख देण्याबरोबरच सुनेच्या अंगावर ५० हजार रुपयांचे दागिनेही घातले. ज्योती काही दिवस येथे राहिल्यानंतर माहेरी गेली आणि परत आलीच नाही. वारंवार प्रयत्न करूनदेखील ज्योती येत नसल्याचे पाहून डोंगरेंना संशय आला. त्यांनी तपास केला असता ज्योतीचे या अगोदर ३ विवाह झाले असून चौथा विवाह तिने त्यांच्या मुलासोबत केल्याचे तसेच आता ती पाचवे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे कळताच त्यांना मोठा धक्का बसला.

- Advertisement -

या टोळीने इतरांचीही फसवणूक केल्याचे समोर आल्याने अशोक डोंगरे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी ज्योती, तिची आई विमल बेंद्रे, वडील बंडू बेंद्रे, लग्न जमवणारे पूजा भागवत गुळे व विठ्ठल पांडुरंग मुंडे (सर्व रा. अहमदपूर जि. लातूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी वरिष्ठांना माहिती देत तपासाची चक्रे फिरवली. हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत गेल्याचे कळताच बिंग फुटेल म्हणून सर्वजण तडजोड करण्यासाठी मनमाडला डोंगरे यांच्याकडे आले. मात्र, त्यांनी पोलिसांना याची माहिती देताच गलांडे यांनी सापळा रचून सर्वाना अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. सहायक अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे उपनिरीक्षक खैरनार करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -