घरमहाराष्ट्रनाशिकबालविवाह प्रतिबंधासाठी जि.प.ची धडक मोहीम; होणार मोठी कारवाई

बालविवाह प्रतिबंधासाठी जि.प.ची धडक मोहीम; होणार मोठी कारवाई

Subscribe

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणावर विवाह केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अशा प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंबधी महिला व बालकल्याण विभागाला निर्देश दिले असून त्यानुषंगाने महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी गुरुवारी सर्व बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांची बैठक घेत संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी विशेष धडक मोहीम राबवण्याचा सूचना दिल्या.

ग्रामीण भागात लहान वयात मुलामुलींची लग्ने लावून दिली जातात, शासनाने विवाह योग्य वय हे मुलाचे २१ व मुलीचे १८ ठरवून दिले आहे तरीसुद्धा अनिष्ठ रूढी परंपरांच्या विळख्यात व चुकीच्या धारणेतून ग्रामीण भागात बालविवाह केले जातात. या बालविवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने बालविवाह प्रतिबंधक कायदा केला असून बालविवाहास कारणीभूत ठरणार्‍या सर्व व्यक्तींना शिक्षेची तरदूत यामध्ये करण्यात आली आहे, साधारणतः ग्रामीण भागात वय वर्ष १४ वर्ष ते १७ वयोगटातील मुलींचे विवाह हे लावून दिले जातात.

- Advertisement -

अशा विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने धडक मोहीम हाती घेतील असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील काळात ग्राम बाल दक्षता समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. दवंडीसह गावातील सरपंच, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका, यांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम देखील केले जाणार आहेत. या विशेष मोहिमेत पहिल्या टप्प्यात जनजागृती केली जाणार असून त्यानंतर बालविवाह होणार अथवा झालेले आढळल्यास प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ग्रामपंचायत विभाग व पोलीस प्रशासनाची मदत देखील घेतली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून पुढील काळात १८ वर्षाखालील मुलींची नोंदणी केली जाणार असून गावात होणा-या विवाहांचे देखील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -