मलिक आणि देशमुखांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाही – विशेष पीएमएलए कोर्ट

अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही.

ED opposes anil Deshmukh nawab Malik voting application

मुंबईः राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. सेशन्स कोर्टानं दोन्ही नेत्यांचे अर्ज फेटाळले असून, आता ते दोघेही मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोन्ही नेत्यांचे विशेष पीएमएलए कोर्टानं अर्ज फेटाळले असून, आता ते मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.

विशेष म्हणजे 8 जून रोजी पीएमएलए कोर्टानं यावरील निकाल राखून ठेवला होता, त्यावर पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली असता तो फेटाळून लावण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभेच्या 10 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी एका दिवसासाठी जामीन मिळावा, या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं सुनावणीदरम्यान ईडीने सांगितले.


अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. या दोघांची याचिका फेटाळण्यात यावी, असे ईडीने आपल्या दाव्यासह म्हटले आहे. याच आधारावर मलिक यांच्या याचिकेला ईडीनेही विरोध केलाय.

अन्सारी आणि यादव यांना परवानगी नाकारली

विशेष म्हणजे 23 मार्च 2018 ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतही असाच प्रसंग घडला होता. उत्तर प्रदेशमधले बसपाचे बाहुबली नेते मुख्तार अन्सारी आणि समाजवादी पक्षाचे आमदार हरी यादव हे दोघेसुद्धा तुरुंगात असताना त्यांना मतदान करता आले नव्हते. या दोन्ही आमदारांनी 23 मार्च 2018 रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात भाग घेण्यासाठी अलाहाबाद न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, पण न्यायालयानं ती नाकारली होती. मुख्तार अन्सारी हे भाजपचे आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येतील तसेच इतर अनेक प्रकरणातील मुख्य आरोपी होते. समाजवादी पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं नातेवाईक हरिओम यादव हे मारहाण प्रकरणात फिरोजाबाद जेलमध्ये बंद होते. त्यावेळी या दोघांनी मतदानाची परवानगी मागितली असता त्यांना नाकारण्यात आली होती.


हेही वाचाः अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार का?; केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं