NCBच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

nawab malik serious allegation on ncb and sameer wankhede
NCBच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

एनसीबीची ड्रग्ज प्रकरणातील कारवाई बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीच्या माध्यमातून आणि समीर वानखेडे यांच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीचा राजकीय हेतूने वापर करण्यात येत असून आर्यन खानचे प्रकरण बनवाट असल्याचा उल्लेखही नवाब मलिक केला. एनसीबी काही लोकांना जामीन मिळवण्यासाठी मदत करत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नवाब मलिकांनी एनसीबी दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला. एनसीबी प्रत्येक केसमध्ये युक्तीवाद बदलत जात आहे. लोकांचा जामीन कसा थांबवता येतो हा एनसीबीचा टॅक्टिक आहे. याची अनेक उदाहरणे आहेत असे मलिक यांनी सांगितले. तसेच आमच्या केसमध्ये जेव्हा एनडीपीएसच्या न्यायालयात जामीनसाठी गेलो तेव्हा एक चॅट दाखवण्यात आले आहेत. ५ लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार केला असल्याचे चॅट होते. त्यामध्ये मोठ्या जावयाने छोट्या जावयाकडून पैसे मागण्यासंदर्भातील चॅट होते. मग जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आली तेव्हा त्यामध्ये या चॅटचा उल्लेख नाही. लोकांना त्रास कसा द्यायचा आणि जामीन मिळणार नाही अशी भूमिका घ्यायची असा आरोप एनसीबीवर नवाब मलिकांनी केला आहे.

एनसीबीची कारवाई बनावट

नवाब मलिक यांनी सांगितले की, माज्याकडे पुरावा आहे. एका प्रकरणात एनसीबीने लिहून दिलंय हा जामीनपात्र गुन्हा आहे. काही लोकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करायची, काही लोकांना विरोध करायचा ही एनसीबीची पद्धत आहे. आर्यन खानचे प्रकरण बनावट आहे. एनसीबीची कारवाई बनावट आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलत असल्याचे नवाब मलिक म्हणाले. जे पुरावे आम्ही दाखवत आहोत. क्रूझवर कुठलेही ड्रग्ज सापडले नाही. सगळे पुरावे दाखवण्यात आले ते सगळे समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहेत. आरोपीच्या वकिलांना आमची मदत हवी असल्यास आम्ही त्यांना मदत करु असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

एनसीबीचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

राजकीय हेतूने राजकीय पक्षाच्या माध्यमातून एनसीबीचा वापर करण्यात येत आहे. दहशत निर्माण करुन पैसै उकळण्याचे काम या मुंबई शहरात एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने तक्रार केली आहे. समीर वानखेडेच्या नावे तक्रार दाखल करण्यात आली असून वानखेडेच्या दबावाखाली आमच्याकडून पैसे मागत आहेत अशी तक्रार करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये पैसे मागण्याची तक्रार झाली आहे. जे पैसे खंडणीच्या रुपाने, दबावाच्या रुपाने वसूल करण्याचे उद्योग या मुंबईत सुरु आहेत. आज ना उद्या त्याचा भांडाफोड उघड होणार असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.


हेही वाचा : Cruise Drugs Case: आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला; वकील हायकोर्टात घेणार धाव