घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटील यांचा दुसरा चेहरा 'विरोधकांचे आयुष्य उध्वस्त करणारा'

चंद्रकांत पाटील यांचा दुसरा चेहरा ‘विरोधकांचे आयुष्य उध्वस्त करणारा’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचे दोन चेहरे आहेत. ते स्वतःला प्रांजळ असल्याचा दाखवणारा एक चेहरा तर विरोधकाला राजकीय जीवनातून उठवणारा दुसरा चेहरा आहे, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांनी मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला पत्राने उत्तर देताना मुश्रीफ यांनी ही टीका केली.

मुश्रीफ म्हणाले की, चंद्रकांतदादांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचून मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये चंद्रकांतदादांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली. कोणतीही मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त शोधले, असे वाटते. दादा, गेल्या पाचवर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन- तीन लाख लोकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री मला आहे. मी व माझ्या फाऊंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर आपण पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावाल. त्यामुळे मी जाहीर करत नाही, असा टोमणा मुश्रीफ यांनी मारला.

- Advertisement -

“यापूर्वी मी अनेकवेळा तुमचे दोन चेहरे-स्वभाव आहेत, हे जाहीर केले. एक तुमचा स्वभाव दिसायला मृदू , लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ आहे. तर दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता आणि संपत्तीचा आपला कोणीही विरोधक मग साधा टीका करणारा असो. त्याचा काटा काढायचा व त्याला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करणारा आहे, अशी जळजळीत टीका मुश्रीफ यांनी केली.

या पत्रात मुश्रीफ पुढे म्हणाले की, “मी सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी केला. आपले नाव अजरामर व्हावे, यासाठी मी काम केले. शत्रूलाही मी कधीच त्रास न देता उलट सहकार्य केले. याबाबत माझे सहकारी माझ्यावर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी कागलला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून झाला. ज्याच्यावर खूनाचा आरोप आहे, त्याचे भाजपच्या एका नेत्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन लोकांनी भाजपशी या प्रकरणाचा संबंध लावला. पण माझा या गोष्टीला विरोध आहे. फोटो कुणीही काढून घेईल. विरोधक आहे म्हणून विनाकारण अशा गोष्टी करणे मला योग्य वाटत नाही. मी कुणाचेही आयुष्य उध्वस्त करणार नाही. हा माझा स्वभाव नाही. तसेच मी तुमच्यावर देखील व्यक्तिगत टीका करुन तुम्हाला वेदना देणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -