घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही

लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नाही

Subscribe

पार्थ पवारांची स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आगामी लोकसभा निवडणूक मावळ मतदार संघातून लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे.याविषयी पार्थ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. यासंदर्भात आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांना भेटलेलो नाही,तसेच पक्षाच्या बैठकींमध्ये सहभागी होऊन निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केलेली नाही.पार्थ पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांच्या उमेदवारीवरून गेले काही दिवस सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांना विराम बसला आहे.

मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता,मात्र गेल्या निवडणुकीत या मतदार संघात राष्ट्रवादीला हार सहन करावी लागली. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव केला होता.राष्ट्रवादीमधील बंडखोरी पानसरे यांना भोवली होती.यावेळी मात्र राष्ट्रवादीने या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत कले आहे. यासाठी पार्थ पवार यांच्या नावाचा खडा टाकून पाहण्याचा डाव टाकण्यात आला होता.यावर प्रसारमाध्यमे तसेच लोकांमधून काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज घेतला गेला.गेला आठवडाभर पवारांची तिसरी पिढी राजकारणात अशा बातम्या चर्चिल्या जात होत्या.मात्र, यावर पार्थ यांची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते.

- Advertisement -

आपलं महानगरने यावर प्रकाश टाकतान थेट पार्थ यांच्याशी संपर्क साधला.त्यावेळी पार्थ म्हणाले, मावळमधून मी लोकसभा निवडणूक लढवत आहे,हे मलाच माहिती नव्हते.प्रसार माध्यमांतून त्याची चर्चा होत होती.या चर्चेला काही अर्थ नसून मी निवडणूक लढवण्यास अजिबात इच्छुक नाही.निवडणूक लढवण्यासाठी आधी माझ्या नावाची शिफारस झाली पाहिजे किंवा पक्षश्रेष्ठींकडे मी तशी इच्छा व्यक्त केली पाहिजे.मात्र यापैकी काहीही झालेले नाही.

पार्थ पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे शरद पवार तसेच अजित पवार यांच्या तोंडी घातलेल्या प्रतिक्रियांना राजकीयदृष्ठ्या कोणतेही महत्व राहिलेले नाही.पवारांच्या तिसर्‍या पिढीला उमेदवारी दिली तर इच्छुक कार्यकर्त्यांचे करायचे काय? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला होता.या सवालामुळे ते पार्थ यांच्या उमेदवारीस उत्सुक नसल्याचा तर्क व्यक्त करण्यात आला होता.शरद पवारांच्या या तर्कावर अजित पवारांनी सूचक मौन बाळगल्याचेही बोलले गेले.पण आता पार्थ स्वत: निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने हे सर्व तर्क वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisement -

मावळसाठी लक्ष्मण जगताप उत्सुक

ज्या मतदारसंघात पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती, त्या मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.2014 च्या निवडणुकीत आझम पानसरे यांच्या ऐवजी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली असती तर मावळ मतदार संघ राष्ट्रवादीने नक्की जिंकला असता.पण तसे झाले नाही आणि राष्ट्रवादीची ही हमखास जागा शिवसेनेने काबिज केली.

रायगडमधून भास्कर जाधव?

रायगडमधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जिल्हा पातळीवरून माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव आले आहे. त्यामुळे तटकरे की भास्कर जाधव याबाबत चर्चा सुरू आहे.

पार्थबाबत मी बोलणार नाही-अजित पवार

पार्थच्या लोकसभा निवडणूक उमेदवारीबाबत मी काही बोलणार नाही. उद्या कोणी इच्छा व्यक्त केली म्हणून तिकीट मिळेल असे नसते. त्यासाठी पक्षाची संसदीय समिती असते. उमेदवाराला मतदारसंघात कोणी ओळखतो का,निवडून येण्याची क्षमता आहे का याची चाचपणी करूनच संबंधिताला उमेदवारी दिली जाते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकदा एक भूमिका मांडली आम्ही त्यावर मत मांडत नाही. त्यांनी पार्थबाबत त्यांचं मत स्पष्ट व्यक्त केले आहे की अजून पुढच्या घडामोडी घडायच्या आहेत. परिणामी यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -