घरक्राइम'नजर महानगर'ची : रस्ते अपघातांचे १०२९ बळी

‘नजर महानगर’ची : रस्ते अपघातांचे १०२९ बळी

Subscribe

प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री व शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रस्ते अपघातांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. भारतासह महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या गेल्या दोन दशकांत कमी झालेली नाही. बेशिस्त वाहनचालक, नियमांची पायमल्ली आणि खराब वा सदोष रस्ते यामुळे रस्ते अपघातांतील बळींचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रस्ते अपघातात तब्बल १ हजार 29 वाहनचालकांचे बळी गेले आहेत. २०२२ मध्ये जिल्ह्यात ६३१, शहरात ११९ जणांचा रस्ते अपघातात बळी गेला. तर, २०२१ मध्ये जिल्ह्यात ८६६ व शहरात १६६ जणांना जीवाला मुकावे लागले. जिल्ह्यात दररोज एका वाहनचालकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे वास्तव ‘आपलं महानगर’च्या पाहणीत समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत शहरात एकूण 579 रस्ते अपघात झाले. त्यात राष्ट्रीय महामार्गावर 631, राज्य महामार्गावर १७८ व इतर मार्गांवर 310 जण मृत्यूमुखी पडले. नाशिक शहर पोलिसांनी अपघातांची २० ठिकाणे (ब्लॅक स्पॉट), तर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ९८ ठिकाणे निश्चित केली आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांची कारणे, उपाययोजना अशा मुद्द्यांवर टाकलेला प्रकाश..

  • नाशिक जिल्हा व शहरात सर्वाधिक अपघात दुपारी ४ ते रात्री १२ वाजेदरम्यान झाले
  • अपघातांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक
  • जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये 2 हजार ५७२ जणांचा मृत्यू. त्यात ५५ प्रवाशी हे कारमधून प्रवास करणारे.
  • नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या अहवालानुसार बससारखी सार्वजनिक वाहने दुचाकीसारख्या खासगी वाहनांपेक्षा अधिक सुरक्षित.
  • महामार्गांवरील विनाहेल्मेट दुचाकीचालक, अतिवेग, लेन बदलणे, सीटबेल्ट न वापरणे, धोकादायक माल तथा प्रवासी वाहतूक ही अपघातांची प्रमुख कारणे.
  • देशभरात दरवर्षी सव्वादोन कोटी वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन

 जिल्ह्यातील ९८ ब्लॅक स्पॉट्स

पिंपरी फाटा (इगतपुरी), दहावा मैल (ओझर), मुंगसे फाटा (मालेगाव तालुका), वडाळी भोई शिवार (वडनेर भैरव), खडकजाम शिवार (वडनेर भैरव), उमराणे (देवळा), एसटी कॉलनी (सिन्नर), कुंदेवाडी फाटा (सिन्नर), चांदवड चौफुली (चांदवड), राहुड घाट (चांदवड), मुंढेगाव फाटा (घोटी), धनगरबाबा मंदिर (नाशिक तालुका), विल्होळी गाव (नाशिक तालुका), आठवा मैल (नाशिक तालुका), मालवडी शिवार (वावी), खोपाडी फाटा (वावी), सब स्टेशन (वावी), शिरवाडे फाटा (पिंपळगाव), महिरवणी शिवार (त्र्यंबकेश्वर), बोकडदरे शिवार (निफाड), पांढुर्ली फाटा (सिन्नर), सावरगाव शिवार (येवला), कश्यपी धरण (हरसूल), वीरगाव (सटाणा), सावकी फाटा (सटाणा), कातरवेल बारी (जायखेड), चिराईबारी (जायखेडा), म्हसोबा माथा (लासलगाव), ओझरखेड (वणी), वसालीबारी घाट (घोटी), दीक्षी गाव (ओझर), रामपूर फाटा (वावी), पालखेड फाटा, जोगमोडी गाव (पेठ), कवटी फाटा (वाडीवर्हे), रायगडनगर (वाडीवर्हे), देवरपाडे फाटा (मालेगाव), जीएमडी कॉलेज (सिन्नर), देवपूर फाटा (वावी), हरसूल फाटा (सिन्नर), गोंदेगाव फाटा (सायखेडा), भावडबारी घाट (देवळा), शिवरे फाटा (निफाड), वाघोबा मंदिर (त्र्यंबकेश्वर), अंदरसुल मार्केट (येवला), वालदेवी पूल (वाडीवर्‍हे), चाळीसगाव फाटा (मालेगाव), चिंचवे (देवळा), हॉटेल पुरोहित (सिन्नर), आडवा फाटा (सिन्नर), मालेगाव फाटा (सिन्नर), केला कंपनी (सिन्नर), चाचडगाव (दिंडोरी), देवीचा माथा (चांदवड), टेल्को शोरुम (छावणी), मिरगाव फाटा (वावी), स्टार हॉतेल (पवारवाडी), डुबरे नाका (सिन्नर), घोरवड घाट (सिन्नर), वनारवाडी फाटा (दिंडोरी), रोकडोबा फाटा (छावणी), साकुरफाटा (वाडिवर्‍हे), आठंबेगाव (कळवण), नाकेपाडा (हरसूल), नांदगाव शिवार (वाडिवर्‍हे), सुकेणा गाव (ओझर), जोपूळगाव (पिंपळगाव), कसरनाला (एमआयडीसी, सिन्नर), गिरणारे (नाशिक तालुका), कानमंडाळे गाव (वडनेर भैरव), वडनेर भैरव मंदिर, दहेगाव (चांदवड), मावडी फाटा (वणी), वाके फाटा (मालेगाव तालुका), संगमनेर नाका (सिन्नर), रेस्ट हाऊस (सिन्नर), कोकणगाव फाटा (पिंपळगाव), बेलू फाटा (सिन्नर), आगसखिंड फाटा (सिन्नर), चांदुरी चौफुली (सायखेडा), लखमापूर फाटा (वणी), ओझरखेड धरण (वणी), पारेगाव चौफुली (येवला शहर), गोबापूर गाव (कळवण), बेहड पाडा (हरसूल), लोणवडी पूल (पिंपळगाव), बोकदरा गाव (निफाड), धुळवंडी फाटा (वावी), लासलगाव फाटा (मनमाड), सिन्नर फाटा (घोटी), मुंडेगाव (घोटी), मुसळगाव फाटा (सिन्नर एमआयडीसी), मोहदरी घाट (सिन्नर एमआयडीसी), सावडगाव फाटा (पवारवाडी), गावठाण (सिन्नर), आराई शिवार (सटाणा), वरवंडी (दिंडोरी)

- Advertisement -

ब्लॅक स्पॉटसची निश्चिती अशी..

अपघातांच्या अनुषंगाने आरटीओ, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्लॅक स्पॉट (अपघातप्रणव क्षेत्र) निश्चित केले जातात. तो परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला जातो. रस्त्यावर ५०० मीटर भागात किमान १० जीवघेणे अपघात होणार्‍या अपघातग्रस्त ठिकाणास ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. अशी ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार परिवहन, बांधकाम, शहर वाहतूक विभाग, रस्ते विकास महामंडळ यांनी संयुक्त पाहणी करुन अपघातग्रस्तस्थळांची यादी निश्चित केली आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये, म्हणून उपाययोजना अपेक्षित आहेत. दुर्दैवाने, स्थानिक यंत्रणा कागदोपत्री घोडे नाचवण्यातच धन्यता मानत असल्याने अपघात सुरू आहेत.

महामार्ग नव्हे तर अन्य रस्त्यांवर सर्वाधिक अपघात

राष्ट्रीय महामार्गांपैकी मुंबई -आग्रा महामार्ग व नाशिक-पुणे महामार्गावर झाले आहेत. या दोन्ही महामार्गावर अपघातांचा आकडा फारसा नसून, त्या तुलनेत अन्य रस्त्यांवर अपघात अधिक झाल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर ४५ , राज्य मार्गांवर १० व अन्य मार्गांवर 59 अपघात झाले आहेत.

- Advertisement -

अपघाताची कारणे 

  • भरधाव वेगाने वाहने चालवणे
  • मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे
  • ओव्हरलोड वाहने चालवणे
  • विनाफिटनेस वाहने चालवणे
  • रस्ते दुरुस्ती, अरुंद रस्ते
  • धोकादायक वळण

वाहन प्रवासात हे करू नये

  • दुचाकी, कारसह इतर वाहने नादुरुस्त असतील तर चालवू नये
  • मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये
  • वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये. सिग्नल तोडून किंवा घाईत वाहन चालवू नये
  • विनापरवाना वाहन चालवू नये
  • विनानोंदणी वाहन चालवू नये

अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

  • ट्रॅफिक एज्युकेशन पार्कप्रमाणे जिल्ह्यात वाहतूक नियम जनजागृती व्हावी
  • वारंवार नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांचा परवाना रद्द करावा
  • रस्त्यावर उभी केलेली ब्रेकडाऊन वाहने, तोडलेले दुभाजक
  • महामार्गावरील उड्डाणपुलाखाली चिखल साचू नये, यासाठी नियमित देखभाल व दुरुस्तीसह कायमस्वरुपी उपाययोजनेची गरज
  • धोकादायक वळणांवर फलक लावण्यासह वाहतूक पोलिसांची नियुक्ती
  • रस्त्यावर व रस्त्यालगत वाहने पार्क केली जाणारी वाहने टोईंग वा त्यांच्यावरील कारवाईसाठी पोलिसांचे पेट्रोलिंग
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कठोर कारवाई
  • सीटबेल्ट व हेल्मेटचा नियमित वापरासाठी प्रबोधन
  • शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण मिळावे
  • मार्गांवर लोखंडी किंवा काँक्रिट कठड्याच्या आधी संरक्षक अडथळा (बॅरिअर) बसवणे आवश्यक. त्यामुळे धडकेची तीव्रता कमी होते.

अपघातांना ‘रडार’चा गतिरोधक

जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर रडार यंत्रणा बसविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार रडार यंत्रणा भरधाव वाहनांवर वॉच ठेवणार आहे. ही रडार यंत्रणा एक मिनिटात ६० वाहने स्कॅन करणार असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनमालकांना दंडाचे चलन पाठवले जाणार आहे. रडारच्या प्रस्तावाला पोलीस महासंचालक कार्यालयाने तत्वत: मंजुरी दिली आहे. ही यंत्रणा चांदवड व सिन्नरमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि सहा राज्य महामार्ग जातात. या मार्गांवरील रस्त्याचे दुभाजक काही ठिकाणी खाली-वर आहेत. त्यामुळे जीवघेणे अपघात घडत आहेत. ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी रम्बलर्स बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेग नियंत्रणासाठी जिल्ह्यात चांदवड व सिन्नर येथे रडार यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.: सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

अपघात झाल्यास हे करा

पोलिसांनी तयार केलेला अपघातांचा अहवाल हा वैद्यकीय व विमा संबंधित कामात गरजेचा असतो. त्यामुळे अपघात झाल्यास नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधावा. नागरिकांनी पोलिसांशी ११२ आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधावा. अपघातस्थळाची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांना माहिती देण्यासाठी नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव, वाहन प्रकार, रंग, मॉडेल, तारीख, वेळ आणि ठिकाणाची नोंद करुन ठेवावी.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -