घरताज्या घडामोडी'मी आता बहुजनांची' म्हणत पंकजा मुंडे सुरु करतायत नवी इनिंग

‘मी आता बहुजनांची’ म्हणत पंकजा मुंडे सुरु करतायत नवी इनिंग

Subscribe

माझा पराभव झाला. आता मी परळीत नाही तर राज्यभरात काम करणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत २६ जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उदघाटन करणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या प्रश्नावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन राज्यभर हाती मशाल घेऊन पुन्हा संघर्ष यात्रा काढणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर केली आहे. एकप्रकारे पंकजा मुंडे यांनी आपल्या नव्या इनिंगचीच घोषणा केली आहे. आता मी फक्त परळीची नाही, वंजारी, धनगर, माळ्यांची नाही तर सर्व बहुजन समाजाची झाली आहे, असे सांगत एकप्रकारे बहुजन नेते होण्याकडे त्यांनी वाटचाल सुरु केल्याचा संदेश दिला.

“पराभवासारख्या चिल्लर गोष्टींनी पंकजा मुंडे खचणारी नाही. १ डिसेंबरला मी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि १२ दिवस सर्व माध्यमांवर एकच विषय चालू आहे. त्याच्याआधी टीव्हीवर फक्त संजय राऊतच दिसत होते. मात्र १ डिसेंबर नंतर मी काही न बोलताही माझीच चर्चा सुरु होते. ही किमया गोपीनाथ मुंडे यांची आहे.”, अशी भावना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर व्यक्त केली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड मधील गोपीनाथ गड येथे पंकजा मुंडे यांनी मुंडेना माननाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला भाजपमधील नाराज नेत्यांसहीत प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी शेवटच्या दिवसांपर्यंत एक एक आमदार निवडून आणण्यासाठी प्रचार करत होते. जर मी पक्षासाठी एवढी वणवण केली तर मी पक्षाविरुद्ध बंड का करु? पक्षाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी मी निवडणुकीत प्रचार करत होते. मग तरिही मी बंड करणार? ही पुडी कोणी सोडली. माझ्या फेसबुक पोस्टमध्ये मी असा एकही शब्द लिहिला नव्हता. पंकजा मुंडे पक्ष सोडणार ही बातमी कुठून आली? याचा शोध चंद्रकांत पाटील यांनी आता घ्यावा.

मला प्रदेशाध्यक्षपद किंवा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, म्हणून मी दबाव आणत आहे, अशीही चर्चा केली गेली. पण मी आज सांगू इच्छिते, कोणतेही पद नसताना आज ही जी गर्दी माझ्यासाठी जमली आहे. ही गर्दीच माझे खरे पद आहे. मला कोणत्याही पदाची लालसा नाही.

- Advertisement -

भाजप रिव्हर्स गेअरमध्ये नेऊ नका 

गोपीनाथ मुंडे यांनी मुठभर लोकांचा पक्षा लोकांमध्ये नेला. आजचे नेतृत्वाने पक्षाला रिव्हर्स गेअरमध्ये नेऊ नये, अशी माझी विनंती असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. माझा पराभव झाल्यानंतरही मी पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिले. पक्षाचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले.

आज बंडखोर नेत्याची गरज

बंडखोरीबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज पक्ष विरोधी बाकावर आहेत. त्यामुळे बंडखोर नेत्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी बंड केले म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. सावित्रीबाईंनी बंड केले म्हणूनच स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. आज पक्षाला तोंडाला झिप लावून बसलेल्या नाही तर बंडखोर नेत्याची गरज आहे.

घरात बसणार नाही, संघर्ष करत राहणार

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान स्थापन करुन महाराष्ट्रभर हाती मशाल घेऊन दौरा करणार आहे. पराभूत झाले, पद नाही म्हणून मी घरात बसणार नाही. मला जुना बहुजनांचा पक्ष परत आणायचा आहे. मुंडे, डांगे, खडसेंचा भाजप पुन्हा निर्माण करायचा आहे, अशी घोषणाच पंकजा यांनी केली. राज्यभर दौरा करण्यासाठी मला पक्षाच्या कोअर कमिटीतून मुक्त करा, असेही त्या म्हणाल्या. २६ जानेवारी रोजी नवी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उदघाटन करणार आहे. तर २७ जानेवारी रोजी मराठवाड्याच्या प्रश्नावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मुंडेंचे स्मारक करण्यापेक्षा मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल मुख्यमंत्री झाले आणि लगेच त्यांनी मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याची तयारी दाखवली. मी त्यांना सांगू इच्छिते की, स्मारकाचे काम आता बाजुला ठेवा. मागच्या पाच वर्षात ते झाले नाही. त्यापेक्षा माझ्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहीजेत, शपथ घेतल्यावर लगेच अमुक करा, तमुक करा अशी टीका मी तरी करणार नाही, असे सांगत मुंडे यांनी फडणवीसांना लक्ष्य केले.

 

 

 

२३ तारखेला सूत्र कुठे होते?

मागच्या १२ दिवसांत माझ्या भूमिकेवरुन अनेक चर्चा होत आहेत. वृत्तवाहिन्यावर पॅनल डिस्कशन होत आहे. सूत्र वेगवेगळी माहिती देत आहेत. मात्र हे सर्व सूत्र २३ नोव्हेंबर रोजी कुठे गेले होते? त्यादिवशी फडणवीस आणि अजित पवारांचे कसे जमले हे कुणालाच कसे कळले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -