आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार पालक!

एसएमसीची ऑनलाईन बैठक घेण्यासाठी शिक्षकांची तारेवरची कसरत

No decision yet on reopening schools, colleges, MHA clarifies
अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी नाही; केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

३० जूनपर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय पालकांवर सोपवला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील त्यांच्या शिफारशी घ्यायच्या आहेत. पालकांच्या शिफारशींचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवून शाळा सुरु कारण्याबात निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र  पालिका शाळेचे विद्यार्थी हे झोपडपट्टीमध्ये राहत असल्याने अनेक पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने ही ऑनलाईन बैठक घेताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

‘शाळेत उपस्थित रहा, अन्यथा वेतन कपात केली जाईल’, असा आदेश पालिका शिक्षण विभागाने दिल्यानंतर अनेक शिक्षकांवर क्वारंटाईन केंद्र केलेल्या शाळांबाहेर उभे राहण्याची वेळ आली. या परिस्थितीवर शिक्षक संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे अखेर प्रशासनाने निर्णय मागे घेत ३० जूनपर्यंत शिक्षकांना शाळेत न बोलावता वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली. त्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भातील पालिका आयुक्तांना निर्णय घेण्याचे आदेश दिले. मात्र पालिका आयुक्तांनी आपली ही जबाबदारी विद्यार्थ्यांच्या पालकांवर सोपवली आहे. त्यानुसार पालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेत शाळा सुरु करण्यासंदर्भातील परवानगीचा शिफारशींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विद्यार्थ्यांचे पालक, सचिवपदी मुख्याध्यापक, एक ते दोन शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असतो. या समितीची ऑनलाईन बैठक घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिले आहेत. या बैठकीत ठरणाऱ्या शिफारशींचा प्रस्ताव दिलेल्या नमुन्यामध्ये भरून शहर साधन केंद्राकडे पाठवण्यास सांगितले आहे. परंतु स्थानिक कोरोना परिस्थती ही पालिकेला माहीत असणार की आम्हाला असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घ्यावा असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

त्याचप्रमाणे पालिका शाळेतील अनेक विद्यार्थी हे झोपडपट्टी परिसरात राहत असून त्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नसल्याने या बैठक कशा घ्यायच्या असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर पडला आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये बैठका घेण्याचे आदेश आल्याने अनेक शाळांमधील मुख्याध्यापकांनी शिक्षकांना पालकांच्या घरी पाठवून त्यांच्या मोबाईलवरून ऑनलाईन बैठक घेतल्याचेही समोर आले आहे. झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना शिक्षकांना पालकांच्या घरी जाण्यास भाग पाडण्यात येत असल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


हे ही वाचा – कोरोना मृत्यूचा भार विद्युत दाहिन्यांवर,भविष्यात दाहिन्या बंद पडण्याचा धोका!