काँग्रेसने तुघलक रोड निवडणूक घोटाळा केला – नरेंद्र मोदी

PM Narendra Modi
नरेद्र मोदी

अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या सभेमध्ये सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ती शक्यता फक्त शक्यताच राहिली आहे. यावेळी काँग्रेस सरकारने तुघलक रोड घोटाळा केल्याचा आरोप मोदींनी केला.

काँग्रेसचा ‘तुघलक रोड घोटाळा’- मोदी

‘काँग्रेस-राष्ट्रवादी अशा लोकांसोबत आघाडीत आहेत, जे म्हणतात जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करून टाकू. मला त्यांच्यापासून काहीही आशा नाही. काँग्रेसने भारताला लुटलं, महाराष्ट्राला लुटलं’, असं मोदी म्हणाले. ‘काँग्रेसने तुघलक रोड निवडणूक घोटाळा केलाय. इथे राहणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या घरी मध्य प्रदेशमधून आलेला पैसा आला. हा पैसा काँग्रेस निवडणूक लढवण्यासाठी वापरत आहे. या नोटा म्हणजे काँग्रेसची खरी ओळख आहे’, असा आरोप त्यांनी यावेळी केला.


हेही वाचा – शहिदांच्या नावाने मोदींनी मागितला लातूरमध्ये मतांचा जोगवा

१० वर्ष देशात रिमोट कंट्रोलचं सरकार

दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या रिमोट कंट्रोल स्टाईलवर त्यांनी टीका केली. ‘गेल्या ५ वर्षांत निर्णय घेणारं सरकार भारतानं पाहिलं आहे. त्याआधी १० वर्ष रिमोट कंट्रोलचं सरकार होतं. दररोज घोटाळे समोर येत होते. आता देशात इमानदार चौकीदार चालणार की भ्रष्टाचारी नामदार?’ असं ते म्हणाले. ‘काँग्रेस-एनसीपीच्या सरकारमध्ये देशात दररोज बॉम्बस्फोट होत होते. सगळ्यांचंच जीवन धोक्यात होतं. आता ते बॉम्बब्लास्ट गेले कुठे? या चौकीदाराने दहशतवाद्यांच्या डोक्यात भीती घातली आहे की त्यांची एक चूक त्यांना महागात पडेल. आधीचं सरकार जगासमोर कमजोर वाटत होतं. जवान सूड घेण्याची मागणी करत होते. पण सरकार निर्णय घेत नव्हतं. आमच्या सरकारने घरात घुसून मारण्याची परवानगी आपल्या सैनिकांना दिली’, असा दावा देखील मोदींनी यावेळी केला.


हे वाचलंत का? – मोदींना कुटुंब नसल्यानेच इतरांच्या कुटुंबावर टीका – शरद पवार

पुन्हा शरद पवारांवर टीका केली

यावेळी पुन्हा एकदा मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केलं. ‘देशाच्या नावावर तुम्ही काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान होण्याच्या मुद्द्यावर तुम्ही कधीपर्यंत शांत राहणार? शरदराव, तुमच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं तुम्ही. पण हे नाव लोकांना फसवण्यासाठी ठेवलंय का?’, असं मोदी यावेली बोलताना म्हणाले. यापूर्वी वर्धा आणि लातूरमधल्या सभांमध्ये देखील मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं.


हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? – मोदीजी, हेच का तुमचं पहिलं डिजिटल व्हिलेज?