प्रकाश आंबेडकरांकडून पुन्हा एकदा ‘गोध्राकांड’चा मुद्दा; म्हणाले, “…इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र”

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये झालेल्या 'गोध्रा हत्याकांडा'ची आठवण झाली आहे.

Prakash-Ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये झालेल्या ‘गोध्रा हत्याकांडा’ची आठवण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यात आदिवासी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा ‘गोध्रा कांड’चा मुद्दा उपस्थित करत, भाजपला मतदान केलं, तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी बोलताना त्यांनी लोकांना गुजरातमध्ये झालेल्या ‘गोध्रा हत्याकांडा’ची आठवण करून दिली. राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या सरकारने देशाला महागाईच्या खाईत लोटले आहे. लोकांची लुटमार सुरू आहे. त्यांना सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही. ठरावीक लोकांच्या हिताचं काम हे सरकार करत आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवरून घालवलं पाहिजे, असं आंबेडकरांनी सांगितलं.

तसंच “मला १०० टक्के माहिती आहे की, मुसलमान कमळाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की मी आत्ता मतदान केलं, तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसलेली आहे”, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या या नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा धार्मिक वाद उफाळून येऊ शकतो.

रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला…
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावून ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते. यावर चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भाजपला खुलं आव्हान दिलं होतं. “रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. नाही असं नाही. पण तो बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा. पेट्रोल टाका, डिझेल टाका, काहीही टाका. तो बाहेरून पेटत नाही. तसाच्या तसा राहातो. काय पेंट केलाय कुणाला माहिती. तो पेटतच नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो”, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी हे जळीत हत्याकांड पुन्हा एकदा उकरून काढलंय. “आतून पेटवला म्हणजे जो कुणी आत बसला आहे त्यानंच पेटवला असेल. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र झालं आहे”, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.