‘द केरला स्टोरी’च्या पाठिंब्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांना टोला; म्हणाले…

कोल्हापूर : ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच राजकीय पाठिंबा आणि विरोधामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर्नाटकातील एका सभेत या चित्रपटाला पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोदींना टोला लगावला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट कधीच पाहत नाही. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चित्रपटातून घेण्यासारखे काहीही नसेल, अशी प्रतिक्रिया देताना आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला. ते म्हणाले की, काही जण ठरवून लग्न करतात, काही जण प्रेमविवाह करतात. प्रेमविवाह करताना जात, धर्म बघितले जात नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबतचा अनुभव नसल्यामुळे त्यांना ‘लव्ह जिहाद’बद्दल फारसी माहिती नसेल.

पंतप्रधान मोदींचे ‘द केरला स्टोरी’बद्दल वक्तव्य
कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला पाठिंबा दर्शविला होता. ते म्हणाले होते की, हा चित्रपट दहशतवादी कट आणि कारस्थानांबद्दल आहे. यातून दहशतवादाचा भयावह चेहरा उघड करण्यात आला आहे. बॉम्ब, बंदुका, पिस्तुलांचे आवाज ऐकू येतात, पण समाजाला आतून पोखरणयाचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी कारस्थानाचा आवाज ऐकू येत नाही. अशाच दहशतवादी कथानकावर आधारित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा होत आहे. केरळची कहाणी केवळ एका राज्यातील दहशतवाद्यांच्या धोरणावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे, पण काँग्रेस या दहशतवादाविरोधात तयार करण्यात आलेल्या चित्रपटालाही विरोध करत आहे. एक प्रकारे ते दहशतवादी प्रवृत्तींसोबत उभे आहेत. काँग्रेसने व्होट बँकेसाठी कायम दहशतवाद्यांचा बचाव केला आहे, असा गंभीर आरोप मोदींनी यावेळी केला होता.