भाव पडला, बळीराजा त्रासला; कोथिंबीरच्या जुड्या वाटल्या ‘फुकट’

नाशिक : अतीव मेहनतीने पिकविलेली कोथंबीर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दारावर फुकट वाटण्याची अन् फेकण्याची वेळ शेतकरी वर्गावर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे ‘‘आई जेऊ घालीना अन् बाप भीक मागु देईना’’ अशी अवस्था सध्या शेतकर्‍याची झाली आहे.

साधारणत: 1100 रुपये एकर भांडवली खर्च करुन पिकविलेल्या कोथंबिरीला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणल्यावर जुडीला 1 अन सव्वा रुपया भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग प्रचंड दुखावला आहे. शेतातून बाजारसमितीपर्यंत कोथंबीर आणण्यासाठी लागणारे गाडीभाडेही सुटत नसल्याची व्यथा यावेळी शेतकर्‍यांनी माध्यमांसमोर मांडली. यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दारावर कोथंबिरीच्या जुड्या रस्त्यावर फेकण्याची वेळ बळीराजावर आली.

भंगारला चाळीस रुपये भाव मिळत असतांना शेतकर्‍याच्या मालाला केळव 1 रुपया भाव मिळत असेल तर सांगा कसं जगायचं? असा प्रश्न थेट बाजार समितीतून शेतकरी वर्ग विचारत आहे. भाव पडल्याने शासनाच्या विरोधात शेतकर्‍यांमध्ये संतापाची प्रचंड लाट पसरली असल्याचे दिसुन येत आहे. माध्यमांशी बोलतांना शेतकर्‍यांच्या डोळ्यांत आलेले आसु सरकारच्या नजरेला दिसत नाही का असा प्रश्न बळीराजा विचारत आहे. एकीकडे कांदयाला भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीत कांद्याला 200 ते 300 रुपये भाव मिळत आहे. यामुळे एकरी 40 ते 50 हजार खर्च करुन पिकवलेल्या कांद्याला प्रति क्विंटल केवळ 200 ते 300 रुपये भाव मिळत आहे.

यामुळे संपूर्ण विभागात शेतकरी वर्गाकडून चक्का जाम, निवेदने, शेतात उभ्या पिकावर रोटर फिरविणे अशा कारवाया करण्यात येत आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याच्या कष्टांची विटंबनाच होत असल्याचा आरोप शेतकर्‍याकडून होत आहे. कांद्यासोबत कोथंबिरीवरही लगोलग कुर्‍हाड कोसळल्याने बळीराजा त्रासला आहे.