मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची नाराजी

Bhujbal

नाशिक- मराठी ही भाषा अभिजात भाषा आहे. तिला २२५० वर्षांचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे आपल्या संगमनेरचे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या अहवालात दिलेले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्या सर्व भाषातज्ज्ञांनी तपासला आणि एकमताने तो उचलून धरला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस गेली सात वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे. आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समक्ष भेटून पंतप्रधानांकडे तशी लेखी मागणी केलेली असूनही तिला मान्यता मिळालेली नाही, अशा शब्दात साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते पुढे म्हणाले की, तात्यासाहेबांनी मडगाव,गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची होणारी आबाळ सगळ्यांच्या लक्षात आणून दिली होती. आजच्या संमेलनात आमच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचे सुंदर सादरीकरण केले असून एक फिल्मही तयार केलेली आहे. मराठी ही श्रेष्ठ भाषा असून तिला ५२ बोलीभाषा आहेत. ती अमृतातेही पैजा जिंकणारी असल्याची गर्जना खुद्द ज्ञानोबारायांनीच केलेली आहे. संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत मराठी काय चोरापासून झाली? असा खडा सवाल संत एकनाथांनी विचारलेला आहे. मराठी भाषेतला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती असल्याचे अभिजात समितीने सिद्ध केलेले आहे. पठारे समितीचे सर्व सदस्य आणि समन्वयक प्रा. हरी नरके यांनी प्रचंड संशोधनाने सिद्ध केलेला हा अहवाल मी बारकाईने पाहिलेला आहे. मला अभिमान वाटतो की गाथा सप्तशती ह्या ग्रंथाचे लेखन आपल्या गोदावरीच्या काठावर दोन हजार वर्षांपूर्वी झालेले आहे.

शिवनेरीजवळच्या २२३० वर्षांपूर्वीच्या शिलालेखात मराठी बोलणार्‍यांचा उल्लेख आलेला आहे. तामिळनाडूतील संगम साहित्यात २३०० वर्षांपूर्वी मराठीत बोलणार्या गवंड्यांचा उल्लेख आदराने करण्यात आलेला आहे. ८०० वर्षांपूर्वी म्हैसूरला मराठी भाषेचे महाविद्यालय सुरू झाले होते हा पुरावा बघता मराठीचा काळ २०००वर्षांचा असावा हे मत आता सर्वमान्य व्हायला हवे. मराठी भाषेची होणारी गळचेपी, हेळसांड आपण थांबविली पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम असते तसेच भाषा ही संस्कृतीची निदर्शक असते. मराठी लावण्यवतीचे वर्णन करणारी लावणी अस्सल मराठी आहे आणि शूर मर्दाचा पोवाडा मराठीतच रचला आणि गायला जातो.

नाशिकचा साहित्याशी घनिष्ठ संबंध

ग्रंथकार सभेची स्थापना निफाडचे न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे दोघेही नाशिकमध्ये काही काळ न्यायदानाचे काम करीत होते. ग्रंथकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या ग्रंथकार सभेचे रूपांतर आज साहित्य संमेलनात झाले आहे. महाराष्ट्राचा हा महाउत्सव अखिल भारतीय पातळीवर साजरा केला जात असतो. आपण या घटनेचे साक्षीदार आहोत याचा मला आनंद वाटतो. नाशिकमध्ये १९४२ मध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन संपन्न झाले. ते संमेलन चित्रमंदिर सारख्या थिएटरमध्ये नाट्य क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींनी भरविले होते. त्याचे स्वागताध्यक्ष वामनराव पुरोहित हे नटश्रेष्ठ शिक्षक होते. पुढील काळात माझे सहकारी डॉ. वसंतराव पवार यांनी २००५ मध्ये ७८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत घेतले. त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध दलित लेखक प्रा. केशव मेश्राम होते. त्या संमेलनाच्या आयोजनात कार्याध्यक्ष म्हणून विनायकदादा पाटील यांचा सहभाग होता. हे तिघेही आज आपल्यात नाहीत याचे दु:ख वाटते. पहिल्या दोन संमेलनात सहा दशकाचे अंतर पडलेले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा-सोळा वर्षात कुसुमाग्रज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे.

मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या जागेमध्ये संमेलन साजरे होत असल्याने आपल्या सारस्वतांची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभल्यामुळे संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी ते आमचे भाग्य समजतो.अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक पुन्हा एकदा साहित्यचर्चेच्या व माध्यमांच्या केंद्रस्थानी आले आहे. नाशिकचे दिवंगत कादंबरीकार मुरलीधर खैरनार यांनी त्यावर ‘शोध’ नावाची कादंबरी अलीकडील काळात लिहिली आहे. मराठी कादंबरीत लक्षवेधी, रहस्य आणि थरारकथात्मक कादंबरी असा तिचा उल्लेख केला जातो. आधुनिक भारताच्या इतिहासात १८५७चे बंड प्रसिद्ध आहे. या बंडात नाशिकच्या ७०० भिल्ल बांधवांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. ते बंड भागोजी नाईकांचे बंड म्हणून गाजले. ते बंड इंग्रजांविरुद्ध जसे होते तसे नव्या समाजरचनेसाठी होते. आदिवासींचा प्रश्न त्यातून पुढे आला. १८६० पासून नाशिक निवांत नगर झाले. १८४० ला नेटिव लायब्ररी सुरू झाली. ही लायब्ररी म्हणजे आजचे सार्वजनिक वाचनालय. हे वाचनालय नाशिकचा सांस्कृतिक केंद्रबिंदू ठरलेले आहे. १८६९ साली नाशिक जिल्ह्याची निर्मिती झाली. त्याला आता १५२ वर्षे झाली आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये रेल्वे आली. देवळालीला लष्करी छावणी आली. इंडिया सिक्युरिटी प्रेस आले आणि घाट देवळांचे शहर असलेल्या नाशिकची वाटचाल मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे झाली.

१८६९ साली पुणे सार्वजनिक सभेची शाखा नाशिकमध्ये सुरू झाली. त्यानंतर १८७७ मध्ये लोकहितवादी नाशिकला आले. त्यानंतरच्या पुढच्याच वर्षी १८७८ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नाशकात वास्तव्यास आले. यामुळे नाशिकला सुधारणेचा नवा चेहरा मिळाला. या दोघांनी पुढाकार घेऊन वक्तृत्ववर्धक बालसभा, प्रार्थना समाज, प्रसूतिगृह, औद्योगिक शाळा, अनाथालय अशा विविध संस्था सुरू करून नाशिकच्या सार्वजनिक जीवनाला नवे पावित्र्य व उंची दिली. त्याकाळात नाशिकमध्ये खळबळ उडवून देणार्‍या काही घटना घडलेल्या दिसून येतात. नाशिकमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सेवाकार्य केले. यामध्ये मिस स्वार्टझ्, मिस हार्वे, रेव्हरंड डि के शिंदे यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. काही हिंदूंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याने मोठी खळबळ नाशिकमध्ये झाली होती. ख्रिस्ती धर्म प्रभावातून मोठी साहित्य निर्मिती कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांनी केलेली दिसून येते. या साहित्य संमेलनात लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रे या ग्रंथाविषयी आपण चर्चा करणार आहोत. या काळात मिस मिलर या अमेरिकन ख्रिस्ती महिलेने हिंदू धर्म स्वीकारल्याचे प्रकरण देशभर खळबळ उडवून देणारे ठरले होते.

मिस मिलर हिंदू धर्म प्रवेशानंतर शर्मिष्ठा झाली आणि तिने इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांच्याशी विवाह केला. या प्रकरणात तुकोजीराव होळकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रावबहादूर बोले यांनी पाठिंबा दिलेला दिसून येतो. या शहराची सनातन्यांचे नाशिक अशी ओळख असताना नाशिकची वाटचाल सामाजिक सुधारणा आणि क्रांतिकारकांचे गाव अशी झालेली दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारताची मुहूर्तमेढ येथे रचली. कवी गोविंदांनी मरणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? अशी कविता लिहून या क्रांतीकार्याला हातभार लावलेला दिसतो. म्हणून कवी गोविंदांना स्वातंत्र्यकवी संबोधले जाते. स्वातंत्र्य आंदोलनात नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात अनंत कान्हेरेने जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला आणि या क्रांतिकारी चळवळीचे लोण देशभर पसरले. गोदागौरव लिहिणार्‍या नाशिकच्या राजकवी चंद्रशेखर गोर्‍हे यांनी नाशिक हे तीर्थांचे माहेर, विद्येचे सागर, कर्तृत्त्वाचा सागर आहे असे नाशिकचे वर्णन करून ठेवले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पुढील काळात वसंत कानेटकर यांना मिळाला. त्यांनी ४०हून अधिक उत्तम नाटके रंगभूमीला दिली. पुढील काळात पत्रकार उत्तम कांबळे यांना साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. नाशिकचे खैरनार गुरुजी यांनी ज्योती स्टोअर्सच्या माध्यमातून वाचन संस्कृती घडवण्यासाठी कितीतरी ग्रंथप्रदर्शने भरविली होती. ‘लेखक तुमच्या भेटीला’ असा उपक्रम त्यांच्या पुढच्या पिढीने सुरू ठेवला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा धांडोळा घेताना मला वा. ल. कुलकर्णी यांचीही आठवण होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह दीर्घकाळ चालविला. या सत्याग्रहाच्या कटू अनुभवानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मी हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी प्रतिज्ञा १९३५ मध्ये येवला येथे केली होती. त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालून मुक्ती भूमी उभारली आहे.

डॉ. आंबेडकर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी येऊन गेले आहेत. खुद्द नाशिकमध्ये त्यांनी १९५१ साली महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. सिन्नरला त्यांनी जादाजुडीच्या सत्याग्रहासाठी येऊन लोकांना मार्गदर्शन केले होते. मनमाड येथे झालेल्या सभेत रेल्वे कामगारांना त्यांनी संबोधित केले होते. मनमाडला त्यांच्या प्रेरणेने वसतीगृह सुरू झाले. नाशिकमध्ये रमाबाई आंबेडकर वसतिगृहाचीची सुरुवात त्यांच्याच हस्ते झाली होती. त्यानंतर हे वसतीगृहाची दादासाहेब गायकवाड यांनी चालविले. शांताबाई दाणी यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र कामगिरी केली. दलित मुक्ती लढ्याची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी मी आपल्याला या गोष्टी सांगतो आहे. त्याचे कारण महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने पुढील काळात दलित लेखकांनी लेखन केले. त्यामुळे मराठी साहित्याचा प्रवाह विस्तारत गेलेला आपण पाहिला आहे. आपल्या वाणी आणि लेखणीने भिमशाहीर भिमराव कर्डक यांनी सामाजिक लढ्याला बळ दिलेले दिसून येईल.‘उद्धरली कोटी कुळे’असे बाबासाहेबांच्या जन्माचे वर्णन करणारी कविता लिहिणारे वामनदादा कर्डक, ज्यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे, ‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठे आहे हो? सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो?’ असा रोकडा प्रश्न आपल्याला विचारतात. ते सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील. दलित साहित्याचे क्रांती विज्ञान नाशिकच्या बाबुराव बागूल यांनी मांडले. ‘जेव्हा मी जात चोरली’, ‘मरण स्वस्त होत आहे’ हे त्यांचे कथासंग्रह त्या काळात साहित्य चर्चेत महत्त्वाचे ठरले होते.

पुढील काळात अरुण काळे सारखा दमदार कवी या प्रवाहातून पुढे आला. दलित चळवळ, दलित मुक्ती लढा, दलित साहित्य यासाठी आमच्या नाशिकच्या लेखकांनी मोठे योगदान दिले आहे, ते विसरता येणार नाही. ख्यातनाम विचारवंत रावसाहेब कसबे यांचे वास्तव्य आपल्या नाशिकला असते. नाशिक जिल्हा कृषी संपन्न जिल्हा आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी पुंजाबाबा गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यांनी भाताच्या प्रश्नासाठी केलेले आंदोलन हे देशातील पहिले शेतकरी आंदोलन होते. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांनी सतत चळवळीत सहभाग नोंदवला आहे. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली नंतरच्या काळात झालेले शेतकरी आंदोलन महत्त्वाचे ठरते. राजकीय चळवळीच्या इतिहासात दाभाडी प्रबंध प्रसिद्ध आहे. त्यातून शेतकर्‍यांया राजकीय पक्षाची सुरुवात झाली. या पक्षातून शेतकरी नेते पुढे आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सहकारी चळवळीत लक्ष घातले. सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने सुरू झाले. त्याच बरोबर समाज परिवर्तनासाठी शैक्षणिक चळवळही इथल्या सहकारी चळवळीतील महर्षींनी सुरू केली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सत्यशोधक विचारांच्या कर्मवीरांनी सुरू केली होती.

आज या शैक्षणिक संस्थेने शतकोत्तर वाटचाल सुरू केली आहे. मराठा शिक्षण परिषदेचे दुसरे अधिवेशन नाशिकला १९०८ साली भरणार होते. त्याच्या पुर्वतयारीसाठी आलेले फुले अनुयायी वासुदेव लिंगोजी बिर्जे यांचे नाशिकला प्लेगच्या साथीत निधन झाले. त्यांच्या पत्नी तान्हुबाई बिर्जे या भारतातल्या पहिल्या महिला संपादक. त्या आणि महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी देणारे रावबहादुर वंडेकर यांचे वास्तव्य नाशकात असे. छत्रपती शाहू महाराज यांचा नाशिक जिल्ह्याशी अतिशय निकटचा संपर्क होता. कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी जातीप्रथेविरुद्ध बंड पुकारले. त्यावेळी गणपत दादा मोरे यांना राजर्षी शाहू महाराज थेट त्यांची घरी भेटायला गेले होते. नाशिक जिल्ह्यात शिक्षणासाठी वसतिगृहांची जी चळवळ सुरू झाली तिला बळ देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले होते. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व लोकसभेत केले आणि त्यांच्या कारकीर्दीतच ओझरला मिग विमानाचा कारखाना सुरू झाला. नाशिक जिल्हा सामाजिक परिवर्तनाला अनुकूल जिल्हा आहे. त्यामुळे येथून दादासाहेब गायकवाड लोकसभेत निवडून गेले होते. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी साम्यवादी चळवळीत मोठे योगदान दिले ते आमच्या जिल्ह्यातलेच.

अनेक कर्तृत्ववान आणि कर्तबगार माणसांनी जिल्ह्याचा इतिहास घडविला आहे. तसेच सामान्य माणसांनी समाज बदलासाठी शिक्षणाला मदत केलेली दिसून येते. नाशिकमध्ये रंगुबाई जुन्नरे विद्यालय प्रसिद्ध आहे. कोण या रंगुबाई जुन्नरे ? एक सामान्य कुटुंबातील अशिक्षित स्त्री. तिने कवडी कवडी जमवली आणि अखेरच्या काळात पांडुरंग गायकवाड यांच्या हातात दिली. त्या रकमेतून नाशिकमध्ये त्यांच्या नावाने एक नामवंत शाळा सुरू झाली आहे. शालीमारला सार्वजनिक वाचनालयाजवळ साईखेडकर नावाचे गृहस्थ हात विक्री करीत असत. ते त्याच ठिकाणी राहत असत. त्यांनी पै पै जमा करून ठेवली होती. त्या सामान्य माणसाने आपण जमवलेला पैसा सार्वजनिक वाचनालयाला दिला आणि त्यातून परशुराम सायखेडकर नाट्यगृह उभे राहिले. त्याग करण्याच्या बाबतीत आम्ही नाशिककर कुठेही मागे नाही.

आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला

शाहु महाराजांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. बाबासाहेबांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रांचा महाग्रंथ राज्य शासनाने २१ व्या खंडाच्या रुपाने प्रसिद्ध केलेला आहे. आमच्या नाशिकच्या महाराजा सयाजीरावांची कीर्ती त्रिखंडात गाजलेली आहे. त्यांनी सयाजी विजय मालेतून प्रकाशित केलेले बुद्धचरित्र वाचून बाबासाहेब बुद्धाकडे वळले. त्यांनी या मालिकेत प्रकाशित केलेली ३००हून अधिक पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हवीत असे माझे मत आहे. इतकी ती मोलाची आहेत. त्यांनीच १९०५ साली भारतात शिक्षण प्रथम सक्तीचे, सार्वत्रिक आणि मोफत केले. आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.

महात्मा फुले यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ या मंचावरुन तुमचे स्वागत करतो आहे. हा बदल लक्षात तर घ्याल की नाही? नारळीकर- ठालेपाटील आणि भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा साजरा करीत आहेत. हा काळ आर्टीफिशियल इंटीलिजन्सचा आहे.
लोकहितवादी मंडळ या संस्थेची स्थापना वि. वा. शिरवाडकर तथा आपल्या कुसुमाग्रजांनी सात दशकापूर्वी केली. मंडळाने सादर केलेल्या अनेक नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळाली आहेत. मराठी नाटकाचा झेंडा दिल्लीपर्यंत नेणार्‍या लोकहितवादी मंडळाने नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपला लौकिक निर्माण केला आहे. आकाराने लहान पण सांस्कृतिक क्षेत्रात महान असणार्‍या लोकहितवादी मंडळाला साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे साह्य लाभले.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल अशी अजोड कामगिरी नाशिकने केली आहे. मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषविले होते आणि त्यांनी ‘लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या’ असा सल्ला तुम्हा मंडळींना दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीला अनुलक्षूण सावरकरांनी साहित्य मंचावरून आपले विचार मांडले हे लक्षात येते. पुढील काळात संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना लाभला. मराठी भाषेतले दुसरे ज्ञानपीठ त्यांना मिळाले आहे, हे मी आपणास सांगितले पाहिजे असे नाही.