घरमहाराष्ट्रपुणे जमीन प्रकरण : हा योगायोग नव्हे..., अजित पवारांचा रोख कोणाकडे?

पुणे जमीन प्रकरण : हा योगायोग नव्हे…, अजित पवारांचा रोख कोणाकडे?

Subscribe

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या एका भूखंडावरून विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला आहे. नंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अजितदादांवर थेट आरोप केले. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले. पण त्याचबरोबर, बोरवणकर यांनी केलेले आरोप हा योगायोग नसल्याचे सूचक विधान त्यांनी केले. त्यामुळे अजित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे, यावर चर्चा रंगली आहे.

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी असताना येरवडा येथील एका भूखंडावरून तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर दबाव टाकला होता, असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद बोलावून अजित पवार यांनी हे आरोप फेटाळले आणि याप्रकरणाशी आपला अर्थोअर्थी संबंध नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

- Advertisement -

पण त्याचबरोबर अजित पवार यांनी काही सूचक वक्तव्येही केली. आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीचा मी आहे. येरवडा जमिनीबाबतची प्रक्रिया वस्तुत: 2008 सालची आहे. हे प्रकरण आता उपस्थित करण्यात आले आहे, म्हणजेच 15 वर्षांनंतर याची चर्चा सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना विचारले की, मी हेच टायमिंग कशासाठी? त्यावर, हे टायमिंग का? हे शोधण्याचे काम पत्रकार मित्रांचे आहे, असे अजित पवार यांनी हसून सांगितले.

नक्की काय आहे प्रकरण?
येरवडा येथील तीन एकरचा भूखंड शासनाने 1989मध्ये पोलीस ठाणे आणि गृहसंकुलासाठी पुणे पोलिसांना दिला होता. हा भूखंड पोलिसांच्या हवाली करताना, त्याचा अन्य कामासाठी वापर न करण्याची अटही घालण्यात आली होती. मात्र तरीही, तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी 6 ऑगस्ट 2010 रोजी एव्हरशाइन या कंपनीशी करार केला. त्यानुसार हा भूखंड ताब्यात घेऊन एव्हरशाइन कंपनी जवळच्याच आपल्या अखत्यारितील अन्य भूखंडावर येरवडा पोलीस ठाणे आणि गृहसंकुल बांधून देणार होते. त्यावेळी या तीन एकर भूखंडाची किंमत सुमारे 70 कोटी रुपये होती.

- Advertisement -

तथापि, पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केला आहे. त्यानुसार, एक दिवस आपल्याला तत्कालीन विभागीय आयुक्तांचा फोन आला. येरवाडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भात पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत असून त्यांना तुम्ही एकदा भेटा, असे त्यांनी मला सांगितले. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितले की, या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी. पण मी पालकमंत्र्यांना सांगितले की, येरवडा हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही. तसेच, मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -