पुण्यात लवकरच लोकसभा पोटनिवडणूक होणार; पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी

पुणे : दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यामध्ये लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून १७ दिवसांआधी तयारी सुरू केल्यामुळे लवकरच निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणते उमेदवार या निवडणुकीसाठी उभे राहणार हे पाहावे लागेल. (Lok Sabha by-elections to be held in Pune soon)

पुणे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 17 दिवस आधीपासूनच तयारीला सुरूवात केली आहे. त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्र निश्चितीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. कर्नाटक निवडणुका पार पडल्यनंतर 4 हजार २२० ईव्हीएम, 5 हजार 700 व्हीव्हीपॅट पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय 300 इंजिनीअर्सची नियुक्ती करण्यात आली असून मशिनवर पुणे पोटनिवडणूक अशा आशयाचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याचा अहवाल 30 मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठण्यात येईल. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोग तारीख जाहीर करेल.

पुणे लोकसभेचे खासदार आणि भाजपा नेते गिरीष बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता पुणे जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरू केल्यामुळे लवकरच लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

लोकसभा पोटनिवणूक लवकरच जाहीर होणार असल्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून संजय काकडे, मुरलीधर मोहोळ आणि गिरीष बापट यांची सून स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा असताना महाविकास आघाडीकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा विधानसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारांची एकूण मतदारसंख्या सुमारे 19 लाख 72 हजार इतकी आहे. पुणे लोकसभा क्षेत्रात विधानसभेच्या सहापैकी चार ठिकाणी भाजपा, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे मतदार लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला मतदान करणार हे पाहावे लागेल.