घरमहाराष्ट्रशिवसेनेने आता भाजपचे मंगळसूत्रही घालावे

शिवसेनेने आता भाजपचे मंगळसूत्रही घालावे

Subscribe

“नवरा कसलाही असला तरी संसार टिकावा म्हणून बायको दरवर्षी वटपोर्णिमेला वडाच्या फेऱ्या मारते. त्याप्रमाणे शिवसेना भाजपचे झालेले आहे. शिवसेना ज्या प्रमाणे शिवसैनिकांच्या हातात शिवबंधन बांधते त्याप्रमाणेच त्यांनी आता गळ्यात भाजपचे मंगळसूत्रही घालावे आणि तंटा न करता सुखाचा संसार करावा, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे. उद्यापासून नागपूर येथे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यानिमित्ताने आज विरोधी पक्षांच्यावतीने पत्रकार परिषद आयजित करण्यात आली होती. यावेळी विखे पाटील यांनी सरकारवर टीका करताना सेनेलाही चिमटे काढले.

राज्य चालवण्यास सरकार अनफिट

भाजपने फिटनेस चँलेजसारखा पब्लिसिटी स्टंट केला. पण लोकांचे खरे चँलेजेंस पूर्ण करण्यात अपयशी झाल्यामुळे सरकार पुर्णतः अनफिट ठरले असल्याची टिका विखे पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना सरंक्षण देण्यात सरकार कुचकामी ठरल्यामुळे मागच्या ११ महिन्यात राज्यात २७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून प्रति दिन ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नाणार प्रकल्प, कोकणवासीयांची फसवणूक – धनंजय मुंडे

नाणार प्रकल्पावरुन दोन्ही सत्ताधारी पक्ष भांडत आहेत. सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई जमीनअधिग्रहण थांबवल्याचे सांगतात, तर दुसरीकडे मुख्यमंत्री सौदी अरेबियाच्या सौदी अरमाको या कंपनीसोबत प्रकल्प उभारण्यासाठी दुसरा सामंजस्याचा करार करतात. अरमाको कंपनीने भारताप्रमाणेच इंडोनेशिया सरकारलाही प्रकल्पउभारणीचा प्रस्ताव दिला होता. इंडोनेशिया सरकारने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली, आपले नुकसान होत असून अरमाको कंपनीचा फायदा होतोय, हे लक्षात येताच प्रस्ताव नाकारला होता. भाजप सरकार मात्र नुकसान सहन करुन हा प्रकल्प करत असून सत्ताधाऱ्यांनी प्रकल्पाच्या अट्टाहासापोटी कोकणवासीयांची फसवणूक केली असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

LOP Dhananjay Munde
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

प्लास्टिक बंदी पथकाचे कर्मचारी पैसे उकळतात

सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी केली आहे. मात्र या निर्णयातही काही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. प्लास्टिकबंदीसाठी जे पथक नेमलेले आहे, त्यातील कर्मचारी लोकांकडून दंड वसूलीचा धाक दाखवत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खरंतर प्लास्टिकबंदी करून भ्रष्टाचाराचा एक नवा मार्ग सरकारने खुला केला असल्याची टीका मुंडे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -