Platform Ticket : मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; उद्यापासून नवीन दर लागू होणार

मुंबईतील स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. ९ मे २०२२ ते २३ मे २०२२ पर्यंत १५ दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली आहे.

अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी ९ मे पासून २३ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. त्यानुसार सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट आता १० रुपयांऐवजी ५० रुपयांना मिळणार आहे. एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या. अनेक जणांनी कोणतेही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. परिणामी अनेक एक्स्प्रेस उशिरा धावल्या. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने पुढील १५ दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत येणाऱ्या मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.

कोरोना काळातही प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा कहर आटोक्यात आल्यानंतर पुन्हा या तिकिटांचे दर कमी करण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा गैरप्रकार वाढल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने मध्य रेल्वेकडून तिकीट दर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता तिकीट दर वाढल्यानंतर गर्दी नियंत्रणात राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : १०मे पर्यंत माजी महापौर किशोरी पेडणेकर राणी बागेतील बंगला सोडणार