raj thackeray ayodhya visit : चलो अयोध्या! राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी, मनसेचं शिष्टमंडळ अयोध्येत

raj thackeray ayodhya visit mns preparation
raj thackeray ayodhya visit : चलो अयोध्या! राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी, मनसेचं शिष्टमंडळ अयोध्येत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. राज ठाकरे 5 जूनला आपल्या कुटुंबासोबत अयोध्यात जाणार आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत नसला तरी, अयोध्या दौऱ्यात मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे यासाठी मनसेकडून योग्यपद्धतीने नियोजन केले जातेय. यासाठी मनसेचे एक शिष्टमंडळ येत्या आठवड्यात अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यादरम्यान ते अयोध्या आणि शरयू नदीकाठी शक्तीप्रदर्शन करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी चलो अयोध्याचे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमधून राज ठाकरेंच्या 5 जूनच्या अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर कानाकोपऱ्यातून मनसेचे हजारो कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. यासाठी मनसेकडून रेल्वे प्रशासनाकडे सुमारे 10 ते 12 रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनासाठी अलीकडेच मुंबईतील विभाग अध्यक्षांची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे एक शिष्टमंडळ लवकरचं अयोध्येसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.


Load Shedding : ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचा शॉक; 6 तास वीजपुरवठा बंद