‘म्हणून मी तुला छळतोय’; राज ठाकरेंचे मोदींना फटकारे!

'गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मोदी यांना छळले होते, त्यामुळे आज ते भारतातील सामान्य जनतेला छळत आहेत...' अशी थेट टीका राज ठाकरेंनी मोदी यांच्यावर केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज यांनी त्यांच्या नव्या व्यंगचित्रातून ‘मोदी भारतीय जनतेला छळत आहेत’ अशा अर्थाचा टोला लगावला आहे. चित्रात दाखवण्यात आल्याप्रमाणे मोदींनी भारतीय जनतेची कॉलर पकडली असून, ‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुम्हाला छळतोय’, असं मोदी देशातील जनतेला सांगत आहेत. ‘गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मोदी यांना छळले होते, त्यामुळे आज ते भारतातील सामान्य जनतेला छळत आहेत…’ अशी थेट टीका राज ठाकरेंनी मोदी यांच्यावर केली आहे. नरेंद्र मोदींनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसवर टीकास्त्र सोडल होते.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. ‘मनमोहन सिंग यांचा १० वर्षांचा (२००४ ते २०१४) कार्यकाळ वाया गेला तसंच भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणून बऱ्याच जणांना अशक्त सरकार हवे असते’, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. याशिवाय ‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझ्यावर अनेक खोटे आरोप करुन, माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता’, असंही मोदी त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या याच विधानाला उत्तर म्हणून राज ठाकरे यांनी हे खास व्यंगचित्र रेखाटले आहे.

गेल्या काही काळापासून राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांद्वारे पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. मागील दिवाळीपासूनच राज यांनी व्यंगचित्रांची ही खास मालिका जारी केली आहे. देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, मेट्रो प्रकल्प तसंच अन्य काही सामाजिक विषयांवरुन मोदी सरकारवर टीका करण्यासाठी राज यांनी व्यंगचित्राचा पर्याय निवडला आहे.