घरमहाराष्ट्रकोकणMurud Fishing News : मुरुड-जंजिऱ्याचे मच्छीमार 'चप्पल'मुळे मालामाल

Murud Fishing News : मुरुड-जंजिऱ्याचे मच्छीमार ‘चप्पल’मुळे मालामाल

Subscribe

चप्पल माशांना परदेशात प्रचंड मागणी आहे आणि मुरुड समुद्रात १० दिवसांत तब्बल ८ टन चप्पल मासे जाळ्यात सापडल्याने मुरुड-जंजिरा परिसरातील मच्छीमारांचे दिवस पालटले आहेत.

उदय खोत : आपलं महानगर वृत्तसेवा

नांदगाव : रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा परिसरातील मच्छीमारांचे १० दिवसांपासून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. आधीच मच्छीचा दुष्काळ त्यातच मोठ्या नौकांची मासेमारी यामुळे पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीला आले होते. मात्र, अचानक त्यांना चप्पल माशांची लॉटरी लागली आणि दहा दिवसांत तब्बल ८ चप्पल मासळी त्यांच्या जाळ्यात अडकली. यामुळे छोटे मच्छीमार मालामाल झाले आहेत.

परदेशात मागणी असलेली आणि निर्यात होणारी चप्पल नावाची मासळी मुरूडच्या समुद्रात मिळू लागली आहे. मच्छीचा दु्ष्काळ असताना चप्पल मासा मुबलक जाळ्यात सापडत असल्याने मच्छीमार खुश झाले आहेत. मुरूड परिसरात या मासळीबाबत फारशी माहिती नाही. कोळीदेखील पूर्वी या माशाकडे दुर्लक्ष करायचे. मात्र मुंबईत याला मोठे मार्केट मिळाले आहे. पापलेट सारखीच ही अत्यंत चविष्ट मासळी असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Anganwadi Sevika : अंगणवाडीसेविकांच्या हाती स्मार्टफोन

दालदी जाळी असणाऱ्या नौकांना सुमारे ३० ते ४० वाव म्हणजे ७० ते ८० किलामीचीर समुद्रात गेल्यावर ही मासळी मिळत आहे. ही मासळी समुद्रातूनच मुंबईला परस्पर विक्रीसाठी रोज पाठवली जाते. होळीनंतर चप्पल मासा मिळू लागल्याने मच्छीमारांनी लगेच समुद्रात कूच केले, अशी माहिती नाखवा रोहन निशानदार यांनी ‘आपलं महानगर’ला दिली. त्यामुळे या मासळीचा सीझन सध्या असाच कायम राहील, असा मच्छीमारांचा अंदाज आहे.

- Advertisement -

मच्छीमार रोहन निशानदार यांनी सांगितले की, मुरूड आणि एकदरा येथील सुमारे ४० ते ५० मासेमारी नौकांना दहा दिवसांत सुमारे दहा टन चप्पल मासळी पकडली आहे. एका नौकेला चक्क १९०० किलो मासळी मिळाली असून किलोचा भाव अंदाजे २८० रुपये आहे. साधारण एक मासा एक किलोचा आहे. या माशाच्या तुकड्या तळून आधिक स्वादिष्ट लागतात.

हेही वाचा… Mahad road News : खर्डी ते रायगड रोप-वे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायकच

येथील काही दालदी जाळीच्या नौकांच्या जाळ्यात प्रत्येकी पाच ते सहा लाखांचे चप्पल मासे सापडले, अशी माहिती मुरूडमधील सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन तथा रायगड मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले आणि एकदरा येथील रोहन निशानदार आणि काही मच्छीमारांनी दिली. पण राजपुरी, दिघी, कुडगाव, तुरंबाडी, हरवीत, मेदडी, रहाटाड, वाशी, मजगाव बंदरकाठा या खाडीपट्यात चप्पल मासळी मिळालेली नाही, अशी माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार धनंजय गिदी दिली.

हेही वाचा… Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

मुरूड समुद्रकिनारपट्टीत फिशरिज खाते, मुरूड पोलीस दल आणि तटरक्षक खात्याने काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर एलईडी, पर्सनीनसारख्या बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई करून बंदी घातली. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना चप्पलसारखी मागणी असलेली मच्छी मिळू लागली. याबद्दल मच्छीमारांनी त्यांचे आभार मानलेत.

चप्पल माशाविषयी

चप्पल हा मासा परदेशात ‘लेदर जॅकेट फिश’ या नावाने ओळखला जातो. हा मासा खूप चविष्ट आहे, अशी माहिती रायगड मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘आपलं महानगर’ला दिली. या माशाला २५-३० वर्षांपूर्वी कुणीही ओळखत नव्हते. किंबहुना आम्हीदेखील या ‘सीफूड’कडे त्या काळात दुर्लक्ष केले होते. मात्र, आता चप्पल माशाला खूप मागणी आणि खूप भाव मिळतोय. हा मासा ‘गोवा पापलेट’ या नावानेही ओळखला जातो, अशी माहिती पेणमधील सामाजिक कार्यकर्ते विलास कोळी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -