Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Rajarshi Shahu Maharaj : शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूरकर 100 सेकंद स्तब्ध

Rajarshi Shahu Maharaj : शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूरकर 100 सेकंद स्तब्ध

Subscribe

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त (101st Memorial Day) कोल्हापूरमधील जनतेने आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करूया, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते, त्यानुसार आज (6 मे) सकाळी 10 वाजता संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणी स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले.

२०२२-२३ हे वर्ष लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्षानिमित्त शाहू महाराजांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी गेला वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. आज या कार्यक्रमाची सांगत होत असून यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने आज ६ मे ते १४ मे या कालावधीत कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाहू मिल येथे या पर्वाचा प्रारंभ झाला. यावेळी सकाळी 10 वाजता संपूर्ण जिल्हा राजर्षी शाहू महाराजाच्या स्मरणार्थ 100 सेकंद स्तब्ध झाला होता.

- Advertisement -

शाहू स्मृती स्थळावर शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिक यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले.

जिल्हा प्रशासनाने केलेल्या आावाहनाला जिल्ह्यातील नागिरकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यांवरील एसटी बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने जागेवर थांबल्याचे पाहायला मिळाले. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -