आईच्या तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर आरोग्यमंत्री उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत

प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात, असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. काल, बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरूवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशिर्वाद दिल्याचे सांगतानाच आता याच आर्शिवादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी १ ऑगस्ट रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी जालना जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमावलीचे (कमी उपस्थिती, सोशल डिस्टंसिंग) पालन करण्यात आले. टोपे कुटुंबियांचे जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता. तिथूनच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मार्चच्या सुरूवातीला जेव्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला सुरूवात झाली नेमक्या त्या कसोटीच्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल होत्या. कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या आरोग्यमंत्र्यांना आईच्या भेटी पुरेसा वेळ मिळत नव्हता तरीही ते वेळात वेळ काढून आईला भेटायला जायचे.

ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १४ दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे. पुर्वी निरोप जायला वेळ लागायचा, दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाईक यायलाही विलंब व्हायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरूवात स्वत:पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर १४ दिवसांचा दुखवटा न पाळता याकाळातील विधी तीन दिवसात केले, असे टोपे यांनी सांगितले. जुन्या परंपरा या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही टोपे यांनी सांगितले.


हेही वाचा – अरे देवा! रेनकोट समजून चोरले पीपीई किट आणि…