घरताज्या घडामोडीराजीव सातव यांनी राहुल गांधींकडे राजीनामा पाठवला होता

राजीव सातव यांनी राहुल गांधींकडे राजीनामा पाठवला होता

Subscribe

कोरोनाला मात दिल्यानंतरही संसर्गाविरोधातील झुंज अपयशी ठरलेले खासदार राजीव सातव यांच्यावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जनसमुदाय याठिकाणी पहायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांना राजीव सातव निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला. त्यांच्या सहजतेने आणि प्रामाणिकतेने तसेच पक्षनिष्टेसाठी जमलेली ही गर्दी होती. आज राजीव सातव यांचे पार्थिव अनंतात विलिन झाले. पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील उमेदीच्या काळापासून ते खासदारकीपर्यंतच्या अशा अनेक आठवणी या नक्कीच तरूणाईसमोर एक आदर्श ठेवून आहेत.

लॅपटॉपवर प्रेझेंटेशन करणारा एकमेव उमेदवार 

हॉलमध्ये दोन खुर्च्या, समोर राहुल गांधी आणि युवक प्रदेशाध्यक्षाच्या मुलाखतीला आलेले राजीव. असाच काहीसा किस्सा आहे राजीव सातव यांची युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या मुलाखतीचा. राहुल गांधी कॉंग्रेसची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी देशभरात मुलाखतींचा सपाटा लावला होता. देशभरात राहुल गांधी स्वतः मुलाखती घेण्यासाठी फिरत होते. त्याच स्वरूपाच्या मुलाखतीसाठी राहुल गांधी मुंबईतही आले. महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष पदाच्या मुलाखतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून अनेकांनी मुलाखती दिल्या. राज्यातून मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग या मुलाखतीसाठी आला होता. त्याच मुलाखत देणाऱ्या उमेदवारांपैकी एक उमेदवार होते ते म्हणजे. प्रत्येक उमेदवार आपआपल्यापरीने राहुल गांधी यांच्यासमोर मुलाखत देऊन बाहेर पडत होता. पण या सगळ्यांमध्ये सर्वात वेगळे ठरले ते म्हणजे राजीव सातव. या मुलाखतीच्या निमित्तानेच राहुल गांधी यांच्यासमोर फर्स्ट इम्प्रेशन तयार करण्यात राजीव सातव यशस्वी ठरले, त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही.

- Advertisement -

दोन खुर्च्या आणि राहुल गांधी

संपुर्ण हॉलमध्ये अवघ्या दोन खुर्च्या. तिसरी कोणी व्यक्तीच नाही. फक्त राहुल गांधी समोर आणि मुलाखत देणारा उमेदवार अशीच काहीशी मुलाखतीची रचना. या मुलाखतीसाठी राजीव सातवही मुंबईत दाखल झाले होते. पण त्यांच्या मुलाखतीची तयारीत वेगळी होती. मुलाखत देणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये राजीव सातव हे एकमेव उमेदवार होते, जे आपल्या लॅपटॉपसह मुलाखतीला आले होते. आपल्या मुलाखती दरम्यान मला लॅपटॉपवर प्रेझेंटेशन करायचे आहे, अशी विनंती त्यांनी राहुल गांधी यांना केली. तसेच प्रेझेंटेशनचा लॅपटॉप ठेवण्यासाठी स्टूलही मागून घेतला. लॅपटॉपवर प्रेझेंटेशन दाखवण्याची ही महत्वाची अशी संधी राजीव सातव यांच्याकडे होती. याच संधीचे त्यांनी सोने केले. अत्यंत सहज आणि भावणारे असे प्रेझेंटेशन केल्यावर त्या उमेदवाराची छाप राहुल गांधी यांच्यावर अतिशय इम्प्रेसिव्ह अशी होती. अतिशय सभ्य आणि सहजता असलेल्या राजीव सातव यांच्यातील नेतृत्व गुण राहुल गांधी यांनी हेरले. दरम्यान मुलाखतीसाठी अनेकांनी आपले फोटो आणि कात्रणे सोबत आणली होती. पण राजीव सातव यांचे लॅपटॉप प्रेझेंटेशन मात्र वेगळे ठरले. काही दिवसानंतर दिल्लीतून ठरल की महाराष्ट्र युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी कोण हवय ते. ती निवड झालेली व्यक्ती म्हणजे राजीव सातव. मराठवाड्याच्या त्या तरूणाने अगदी छोट्याश्या कालावधीतील मुलाखतीत आपली मोहोर दिल्लीकरांसमोर उमटवली होती. हीच मुलाखत पुढे त्यांच्या नेतृत्वातील कलागुण दाखवण्यासाठी आणि महत्वाच्या जबाबदारीची धुरा देण्यासाठी यशाचा मार्ग ठरली.

35 व्या वर्षीच दिला राजीनामा

वयाची ३५ वर्षी पुर्ण झाल्यानंतर राजीव सातव यांनी महाराष्ट्र युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचे मार्गदर्शक सचिन सावंत यांनी सांगितल्यानुसार त्यांनी हा राजीनामा दिला होता. वयाची ३५ वर्षे पुर्ण झाल्यानंतर नियमानुसार राहु शकत नाही म्हणून त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला. आपला राजीनामा त्यांनी राहुल गांधी यांना पाठवलाही होता. पण राहुलजींनी तो राजीनामा राहुल गांधी यांनी स्विकारला नाही. त्यांच्या राजीनाम्यातून राहुल गांधी यांना राजीव सातव यांचा प्रामाणिकपणा भावला. हा अनुभवही राजीव सातव आणि राहुल गांधी यांच्यातील मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी कारणीभूत ठरला. राजकारणात कुरघोड्या न करतात प्रामाणिकपणे काम करणे हेच उदिष्ट त्यांनी ठेवले. शिवाय पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांना डावलण्याची कुरघोडीही त्यांनी केली नाही. त्यामुळेच अतिशय लहान वयातच त्यांना मोठ्या जबाबदाऱ्याही मिळाल्या. गुजरातच्या निवडणुकीचा प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. सौरष्ट्र आणि कच्छची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. महत्वाचे म्हणजे अतिशय चांगले यश त्यांनी मिळवून दिले.

- Advertisement -

राजकारणातला आदर्श शरद पवारांमुळेच हिंगोलीची जागा 

राहुल गांधी यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना विचारले की, आप राजनितीमे किसतो आदर्श मानते हो ? तेव्हा पहिल्या रांगेत बसलेल्या अवघ्या ३० वयाच्या तरूणाचे उत्तर येते की शरद पवार. मै शरद पवार साहब को अपना आदर्श मानता हूं. राहुल गांधींना सडेतोड उत्तर देणारा हा तरूण म्हणजे राजीव सातव. पुढे २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी याच तरूणाला हिंगोलीतून जागा लढवण्याची संधी दिली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. पण राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या हिंगोलीच्या जागेसाठी थेट शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बॅ ए आर अंतुले यांच्याकडून बंड होण्याची चिन्हे असतानाही त्यांनी रायगड मागून घेतला. एक तरूण नेतृत्वासाठी शरद पवार यांनी एक सकारात्मक पाऊल या निवडीच्या निमित्ताने उचलले होते. त्या विश्वासाला खर ठरवत राजीव सातव यांनी मोदी लाटेतही विजय खेचून आणला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -