घरमहाराष्ट्रशिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवस बैठकीकडे आ. रवींद्र फाटकांची पाठ

शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवस बैठकीकडे आ. रवींद्र फाटकांची पाठ

Subscribe

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी येणारा वाढदिवस अत्यंत धुमधडाक्यात साजरा करण्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला देसाई यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेनेचे विधान परिषदेतील सदस्य आणि पालघरचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी पाठ फिरवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि मराठी संस्कृतीशी संबंधित प्रत्येक दिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचे शिवसेनेने योजले आहे. 13 जूनच्या आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर १९ जूनचा शिवसेनेचा वर्धापन दिनही वेगळ्या स्वरुपात लक्षवेधी होईल याची काळजी शिवसेनेने घेतली होती. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आपल्या इतिहासात शिवसेनेने प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले होते. यावरून प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर शिवसेनेवर टीकेचे सूरही उमटले होते. सेनेने मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा सकारात्मक फायदा करून घेण्याचे धोरण अवलंबले होते.

- Advertisement -

27 जुलै रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मुंबईसह संपूर्ण राज्यभरात अत्यंत भव्य स्वरूपात करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मुंबई आणि ठाण्यात या कार्यक्रमाची जबाबदारी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आणि चौक नियोजनासाठी ठाणे पालघर मीरा-भाईंदर रायगड या परिसरातील स्थानिक शिवसेना नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाची गरज, रूपरेषा आणि भव्यता यासंदर्भात पक्षाची भूमिका विशद केली, तर अगदी वाड्या-वस्त्यांपासून थेट मंत्रालयापर्यंत या वाढदिवसाचे वेगळेपण कसे जपले जाईल यासाठी एकनाथ शिंदे यांना जातीने लक्ष घालण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या बैठकीला ठाणे आणि आसपासच्या परिसरातील आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि महापौर उपस्थित होते. शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य आणि पालघरचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. रवींद्र फाटक हे सुभाष देसाई यांचे निकटवर्तीय समजले जातात. देसाई यांनी बैठकीमध्ये रवींद्र फाटक यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन पाठक आले नाहीत का, अशी विचारणाही एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसेनेचे सगळे आमदार एकत्र येऊन अभिष्टचिंतन करण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते.

- Advertisement -

त्यावेळीही रवींद्र फाटक यांनी या अभिष्टचिंतनाकडे पाठ फिरवली होती. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी लावलेल्या बैठकीला रवींद्र फाटक यांनी पाठ फिरवल्यामुळे शासकीय विश्रामगृहातील उपस्थित नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. सुभाष देसाई यांनी मुंबईचा रस्ता धरल्यानंतर शिवसेना नेते आणि आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी फाटक यांनी शिंदे यांना दिलेल्या उत्तरामुळे त्यांचे समाधान झाले नाही, अशी विश्वसनीय माहिती ठाण्यातील सेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस बैठकीवेळी मी बाहेर होतो. याविषयी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे या आमच्या नेत्यांशी बोलणे झाले आहे. या आधी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी मातोश्रीवरही मी सकाळी गेलो होतो. त्यावेळी संध्याकाळी माझ्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे मी तिरुपतीला रवाना झालो होतो. – रवींद्र फाटक, आमदार, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -