पुराचा कहर : उस्मानाबादमध्ये लष्कराची मदत, हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन

मुसळधार पावसामुळे तेरणा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Osmanabad Flood

राज्यभरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने काही भागांमध्ये मात्र चांगलाच हाहाःकार माजवला आहे. उस्मानाबाद जिल्हयातदेखील पावसाचा धूमाकूळ कायम असून, तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी स्थानिक प्रशासनाने लष्कराची मदत घेतली.

तेर ढोकी भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. तेरणा धरण पूर्ण भरलं असून, धरणाच्या सर्व दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तेर गावासह तेरणा नदीकाठच्या इर्ला दाऊतपूर गावातही पाणी शिरलं आहे. या गावांमध्ये पाण्यात अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.