घरमहाराष्ट्रमोकाट गुरांच्या वावरामुळे नागरिक त्रस्त!

मोकाट गुरांच्या वावरामुळे नागरिक त्रस्त!

Subscribe

शहरासह परिसरात मोकाट गुराढोरांचा मुक्त वावर असल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तेलवडे विभागात रस्त्यावर बसलेली गुरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या ठिकाणी गुरांचा मुक्तसंचार असतो. वाहनाचा हॉर्न वाजवूनसुद्धा गाय अथवा बैल रस्त्यावरून बाजूला हटण्यास तयार नसतात. या रस्त्यावर बसलेल्या गुरांना वाहन धडकून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गुरांचे मालक मात्र हा प्रकार मख्खपणे पाहतात. कोंडवाडा बांधून या गुरांची त्यात रवानगी करावी. तसेच मालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी सरपंच प्रमोद तांबडकर यांनी केली आहे.

मुरुड बाजारपेठेतील रस्ता वाहतूक व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. येथून सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर मोकाट गुरांचा सातत्याने ‘रास्ता रोको’ कार्यक्रम होत असल्याने वाहन चालकांसह प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. मोकाट गुरांचा कळप दिवसा व रात्री रस्त्यावर मधोमध ठाण मांडत असल्याने जिवघेण्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे. काही गुरे तर दुकानात गेलेल्या ग्राहकाच्या मोटरसायकलला लावलेली पिशवी पाडून नुकसान करतात. अलिकडे तर एका बैलाने भर मच्छी मार्केटमध्ये धुडगूस घालून सर्वांना पळता भुई थोडी केली होती. अनेकदा दोन बैलांच्या झुंजीसुद्धा पहावयास मिळतात. यावेळी उधळणार्‍या बैलांमुळे तेथे बाका प्रसंगही उद्भवू शकतो. नगर परिषदेने या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -