घरमहाराष्ट्रसदानंद कदम ईडीच्या अटकेत

सदानंद कदम ईडीच्या अटकेत

Subscribe

साई रिसॉर्टबाबत कारवाई, अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ४ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अ‍ॅड. अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना अटक केली आहे. या अटकेमुळे अनिल परबदेखील अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. गेल्याच आठवड्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील ९ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात भाजप सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवाय भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवरील कारवाई थंड पडत असल्याचे अनेक दाखलेही पत्रातून देण्यात आले होते. या पत्रानंतर ईडी, सीबीआयच्या कारवायांत घट होईल अशी अपेक्षा असतानाच साई रिसॉर्टप्रकरणी कारवाईला वेग आला हे विशेष.

केबल व्यावसायिक असलेले सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता कुडोशी येथील अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी दाखल होत ईडीच्या पथकाने सदानंद कदम यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईला आणत त्यांची ४ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी सदानंद कदम यांना न्यायालयात हजर केले जाईल. उद्धव ठाकरे यांची खेडमधील सभा यशस्वी करण्याकरिता सदानंद कदम यांचा हात होता, म्हणूनच सूडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली. सदानंद कदम यांच्यावर झालेली ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

तीन वर्षांपूर्वी दापोली साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले होते. १ कोटी १० लाख रुपयांमध्ये साई रिसॉर्टची ही जमीन खरेदी करून तिथे अनधिकृतपणे रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले होते. यावेळी सीआरझेडच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग झाले होते. त्यामुळे संबंधित व्यक्तींविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवून ईडीने चौकशीला सुरुवात केली होती. या गैरव्यवहाराची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने दापोलीच्या मुरूड येथील ४२ गुंठे जागा आणि त्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट अशी एकूण सव्वादहा कोटींची मालमत्ता जप्त केली होती. याच साई रिसॉर्टचे मालक म्हणून सदानंद कदम यांचे नाव कागदोपत्री दाखविण्यात आले होते.

किरीट सोमय्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव
अ‍ॅड. अनिल परब यांनी वांद्रे येथील म्हाडाची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर म्हाडाकडून अनिल परब यांना नोटीस देत कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी अ‍ॅड. अनिल परब यांनी आक्रमक होत शुक्रवारी विधान परिषदेत किरीट सोमय्या आणि म्हाडाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. ही जागा माझ्या नावावर नसल्याचे तपासातून पुढे आल्यावर म्हाडाने ही नोटीस मागे घेतली. म्हाडाच्या नोटिशीनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत माझ्यावर संबंधित जमीन बळकावल्याचा आरोप केला.

- Advertisement -

तसेच त्यांनी लोकायुक्तांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्या यांनी केला, असे म्हणत अ‍ॅड. अनिल परब यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम २४१ अन्वये म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाच्या कारवाईसाठी पत्र दिले. हे पत्र पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी मागणीही अनिल परब यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -