घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"शिक्षण अधिकाऱ्यांची खाबुगिरी" वेतन दीड लाख; मालमत्ता कोट्यवधींची; वाचा कोणाची किती संपत्ती

“शिक्षण अधिकाऱ्यांची खाबुगिरी” वेतन दीड लाख; मालमत्ता कोट्यवधींची; वाचा कोणाची किती संपत्ती

Subscribe

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात काही पुरावे अथवा माहिती असल्यास 9975547616 या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

नाशिक । शिक्षण विभागातील विविध अधिकार्‍यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पडकलेले आहे. यात सुनीता धनगर, डॉ. वैशाली वीर झनकर, प्रवीण पाटील, किशोर पाटील, रामचंद्र जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांकडेच कोट्यवधींची मालमत्ता आढळलेली असताना त्यांच्याकडे ही संपत्ती आली कुठून याचा साधा तपासही शासकीय व्यवस्थेने केला नाही, हे विशेष. या संपत्तीची चौकशी होऊ नये म्हणून सरकारी अधिकार्‍यांचे ‘खिसे गरम’ करण्यात आल्याचीही चर्चा आहे. शिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍याला दर महिन्याला दीड लाखांपर्यंत वेतन मिळते. या वेतनात त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालू शकतो. परंतु, वैध मार्गाने मिळते त्यावर समाधानी न राहता वाममार्गाने पैसा कमावण्याची लालसा घातक ठरत असल्याचे स्पष्ट होते. त्यातून ते मोठी संपत्ती जरी कमावत असले तरी कधी ना कधी हा काळाधंदा उघडकीस येतोच, हे आजवरच्या विविध घटनांवरुन जनतेसमोर आले आहे. विशेष म्हणजे या अधिकार्‍यांनी जमवलेला काळा पैसा मोजण्यासाठी अनेक घटनांमध्ये पोलिसांना चक्क पैसे मोजणारे मशीन मागवावे लागले.

 

- Advertisement -

डॉ. झनकरकडे तीन एकर जागा

जिल्हा परिषदेच्या लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर- झनकरकडेही अशाच प्रकारची संपत्ती आढळली होती. झनकरला आठ लाखांची लाच घेताना ऑगस्ट-२०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी झनकरच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या नावावरील मालमत्ता पाहून पोलिसही अवाक झाले होते. डॉ. झनकरच्या नावावर शहरातील शिवाजीनगर, गंगापूर रोड, मुरबाड, गंधारे कल्याण या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट तसेच सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे, कल्याण येथील मिलिंदनगरमध्ये ३१.७० गुंठे, १०.८ गुंठे, ४०.८० गुंठे, 13.10१३.१० गुंठे तर, सिन्नरमध्ये ०.५६ गुंठे, ३.४१ गुंठे, २२.७० गुंठे अशी एकूण सुमारे १२३.६४ गुंठे अर्थात सर्व मिळूण एकूण 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली होती. तसेच, ४० हजारांची रोख रक्कम, एक होंडासिटी कार आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकी अशी वाहने पोलिसांना आढळून आली. या प्रकरणाच्या तपासांतर्गत घरझडतीत अधिकार्‍यांनी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इत्यादी बँकांचे पासबूक जप्त केले होते.

अनिल जाधवकडे १ कोटी ६१ लाख

नाशिकचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल मदन जाधव यांना तब्बल ५ लाखांची लाच घेताना गेल्यावर्षी रंगेहात पकडण्यात आले होते. मुंबईच्या एसबी पथकाने ही कारवाई केली. जाधवच्या मुंबईतील राहत्या घरी एसीबीच्या पथकाने छापा टाकला तेव्हा त्यांच्या घरझडतीत ७९ लाख ४६ हजार ७४५ किमतीची एक किलो ५७२ ग्रॅम सोन्याची नाणी, बिस्किटे व दागिने सापडले. ७९ लाख ६३ हजार ५०० एवढी बेहिशेबी रोख रक्कम मिळून आली. कार्यालय झडतीत २ लाख २८ हजार बेहिशेबी रोख रक्कम अशा एकूण १ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.

- Advertisement -

रामचंद्र जाधवकडे उत्पन्नाच्या २३ टक्केअधिक रक्कम

नाशिकचे तात्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यापूर्वी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी जाधवसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्ट्राचाराच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधवविषयी गुप्त चौकशीला सुरुवात केली होती. प्राथमिक चौकशीत जाधवकडे भष्ट्राचारातून मिळविलेली मालमत्ता असल्याचे आढळल्यावर त्याविषयी उघड चौकशीचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने वरिष्ठांकडे पाठविला. त्याला २०१४ मध्ये मान्यता मिळून त्यांची उघड चौकशी सुरू करण्यात आली. १५ जून १९८५ पासून ते ३१ मार्च २०१२ पर्यंतच्या त्यांच्या सेवाकाळात त्यांच्याकडे २ कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली. त्यांची पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर येथे मालमत्ता आढळून आली. या कालावधीत त्यांच्या ज्ञात स्त्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ४६ लाख ८२ हजार ४०३ रुपयांचा हिशोब त्यांना देता आला नाही. त्यामुळे त्यांनी ही रक्कम भ्रष्ट मार्गाने मिळविली असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. म्हणजे जाधवने ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल २३ टक्के अधिक अपसंपदा बाळगल्याबद्दल २०१९ मध्ये त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ नुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धनगरकडे साडेचार कोटींची प्रॉपर्टी

निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेताना नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगरला काही दिवसांपूर्वीच रंगेहात पकडले होते. धनगर हिच्या घरांची झडती घेतली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल ८५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३२ तोळे सोने, बँक खात्यातही ३० लाख अशी मालमत्ता आढळली. नाशिक एसीबीने जानेवारीपासून ते आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ही सर्वात जास्त रक्कम आढळून आली आहे. तसेच, धनगरच्या नावावर दोन फ्लॅट्स आणि एक प्लॉटही आहे. अशी एकूण सुमारे साडेचार कोटींपर्यंतची मालमत्ता धनगरकडे असल्याचे आजवर झालेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे.

धुळ्यात सात माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई

मार्च २०१७ ला धुळ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना दोन लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचला होता. फेब्रुवारी-२०१७ मध्ये दाखल झालेल्या शिक्षक नियुक्त्यांचा भंग केल्याप्रकरणांत आरोपी न करण्यासाठी एका कारकुनाकडून या दोघांनी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम दोन लाख ३० हजार ठरविण्यात आली. लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर दोन्ही पाटलांच्या घरीही मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळली होती. धुळ्यात कारवाई झालेला प्रवीण पाटील सातवे माध्यमिक शिक्षणाधिकारी होते. त्यापूर्वी जे. के. ठाकूर, जी. के. पाडवी, भगवान सूर्यवंशी, जी. एन. पाटील, डी. एल. साळुंखे आणि परचुरे अशा सहा माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने निलंबनाची कारवाई झाली आहे.

उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाणने घेतले सहा हजार

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील तात्कालीन उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांना तीन वर्षांपूर्वी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने अटक केली होती. भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवर सही करण्यासाठी १५ हजार रुपये लाच मागितली. यामध्ये तडजोड करून शेवटी सहा हजार रुपये घेऊन स्वाक्षर्‍या करण्याचे ठरले.

उपसंचालक प्रवीण अहिरेवर कारवाई

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तात्कालीन उपसंचालक प्रवीण अहिरे याला २०२० मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)अटक केली होती. लाच घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा; तसेच बनावट शासकीय कागदपत्रे तयार करण्याचा ठपका अहिरे याच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच, जळगाव येथील आर. पी. विद्यालयात विनाअनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची लाच मागिल्याप्रकरण जळगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश खोडपे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -