Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची शरद पवारांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची शरद पवारांची घोषणा

Subscribe

अनपेक्षित घोषणेने राष्ट्रवादीत मोठा भूकंप,१८ जणांची समिती पक्षाचा नवा अध्यक्ष निवडणार कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर निर्णयाचा फेरविचार करणार

खासदार शरद पवार यांनी आपल्या राजकीय शैलीनुसार सर्वांनाच अनपेक्षितपणे धक्का देत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात भाषण करताना शरद पवारांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. तेव्हा सभागृहात उपस्थित राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. भाजपविरोधी आघाडीत शरद पवारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे देशभरात हे वृत्त वार्‍यासारखे पसरल्यावर राज्य आणि देशाच्या राजकारणातही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. भावूक झालेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांना गळ घातली, तर कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. त्यानंतर पुढील २ ते ३ दिवसांत या निर्णयावर विचार करण्याचे आश्वासन शरद पवारांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून गेली २४ वर्षे पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण राजकीय प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. माणसाला अधिक मोह असू नये. त्यामुळे तुम्हाला कदाचित अस्वस्थता वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी केली.

- Advertisement -

या अनपेक्षित घोषणेने राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते तळागाळातील तमाम कार्यकर्त्यापर्यंत सर्वंनाच धक्का बसला. ध्यानीमनी नसताना शरद पवार यांनी आपला निर्णय घोषित केल्याने नेते आणि कार्यकर्ते अवाक झाले होते. अखेर कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सुरू असलेली मनधरणी लक्षात घेऊन शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पवारांच्या निर्णयाचे गूढ कायम असणार आहे.

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असताना आणि भाजपविरोधी पक्षाची मोट बांधली जात असताना ८३ वर्षीय शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचे घोषित केल्याने राज्यात महाविकास आघाडीलाही धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असताना शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देत अजित पवार यांचे संभाव्य बंड आणि राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसविल्याचे बोलले जाते. आता दोन ते तीन दिवसांनंतर पवार आपल्या निर्णयाविषयी नेमका काय फेरविचार करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते, पण ही भाकरी अशा पद्धतीने फिरवली जाईल, यावर कार्यकर्त्यांचा अजूनही विश्वास नाही.

- Advertisement -

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती…’ या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी भाषण केले. कार्यक्रम अतिशय सुरळीत सुरू होता. प्रतिभाताई पवारदेखील या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या भाषणातच पवारांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. काही सेकंद उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना काहीच कळले नाही. ते स्तब्धच झाले, पण त्यानंतर नेते, कार्यकर्ते यांच्या भावनांचा बांध फुटला. शरद पवारांचे भाषण संपल्यानंतर नेत्या, कार्यकर्त्यांनी पवारांना अक्षरशः घेराव घातला. जोपर्यंत साहेब आपला निर्णय बदलत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. सभागृहाच्या व्यासपीठावर प्रतिभाताई पवार यादेखील पवार यांच्यासोबत बसून होत्या. पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते स्टेजवर आले. प्रत्येकाने शरद पवार यांना आपला निर्णय बदलण्याची विनंती केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर प्रचंड भावनिक झाले होते. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. पवारांच्या समोरच जवळपास पावणे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विनंती केल्यानंतर शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून बाहेर पडू शकले. आम्ही शरद पवारांशी चर्चा करून त्यांचे मन वळवतो आणि तुम्हाला हवा तसा निर्णय होईल, असा दिलासा यावेळी या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला, मात्र पवार गेल्यानंतर युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पायर्‍यांवर उपोषणाला बसले. पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी घोषणाबाजी हे कार्यकर्ते करत होते.

शरद पवार म्हणाले……
पक्षाध्यक्ष पदावरून दूर होण्याचे सांगताना पवार म्हणाले, राज्यसभेचा तीन वर्षांचा कालावधी अजून शिल्लक आहे. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल. याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती आणि विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी तसेच समाजातील इतर कमकुवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहील. आता मी कोणत्याही निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे जी तीन वर्ष राहिली आहेत, त्या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नात अधिक लक्ष घालण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही.

रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदिर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ (उरळी कांचन, पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) या संस्थांमधून साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी तसेच काही लाख ग्रंथांचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस आणि साखरकारखानदारी क्षेत्रात संशोधन- विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थांची मी जबाबदारी सांभाळत आहे. या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने आणि आपण सर्वांनी मला खंबीर साथ दिली, हे मी विसरू शकत नाही, परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते, असे सांगत पवार यांनी रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी, अशी सूचना केली.

नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती
पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठीच्या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड आदींचा समावेश असेल. ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहील, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ठिय्या
शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी गेल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, रोहित पवार, अशोक पवार, शेखर निकम यांनी निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. दरम्यानच्या काळात पक्षाचे काही नेते, राष्ट्रवादी युवक, महिला तसेच इतर सेलचे पदाधिकारी-कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेरच ठिय्या मांडून बसले होते. पवारसाहेब जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत येथून हटणार नाही, असा कार्यकर्त्यांचा निर्धार होता. जवळपास सुमारे ६ तास हे सगळे नाट्य सुरू होते.

शरद पवार फेरविचार करणार
दरम्यान, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी अजित पवार, सुप्रिया सुळे हे शरद पवार यांचा संदेश घेऊन कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण जो निर्णय घेतला आहे त्याचा फेरविचार करू, पण त्यासाठी मला २ ते ३ दिवस लागतील, मात्र या काळात कार्यकर्त्यांनी तात्काळ आंदोलन थांबविले पाहिजे. राजीनामा सत्रदेखील तात्काळ थांबले पाहिजे. जर कोणी आंदोलन सुरू ठेवले, तर मात्र मी आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार नाही, असे शरद पवार म्हणाल्याचे अजितदादांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. साहेबांनी विचारपूर्वकच निर्णय घेतला असणार. त्यामुळे त्यांना आपण २ ते ३ तासात निर्णयाचा फेरविचार करा, असे आपण सांगू शकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

धाराशीव, बुलढाणा येथील जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्षच काय कोणीही राजीनामा देण्याची गरज नाही. राजीनामा सत्र थांबविण्याचे आवाहन साहेबांनी केले आहे. बैठकीत कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा झाली नाही, मात्र आपली इच्छा असेल तर कार्याध्यक्षपदाबाबत विचार करा, अशी विनंती आम्ही केल्याचे अजित पवार म्हणाले. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी यावेळी कार्यकर्त्यांचा फोनद्वारे शरद पवार यांच्याशी संवादही साधून दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

किती वेळा सांगू राष्ट्रवादी सोडणार नाही
अजित पवार हे पक्ष सोडणार अशा चर्चा वावड्या गेल्या काही दिवसांत सुरू होत्या. स्वत: अजित पवार यांनी या चर्चा साफ खोट्या असल्याचे आधीच जाहीर केले होते. यावेळीदेखील त्यांना माध्यम प्रतिनिधींनी याबाबत छेडले असता किती वेळा सांगू मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही म्हणून, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

- Advertisment -