शरद पवारांचे मणिपूर कनेक्शन; राजीनामा नाट्यातही मदतीचा हात

संग्रहित छायाचित्र

 

सांगलीः राजीनामा नाट्य सुरु असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूर येथील हिंसाचारात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. सिलव्हर ओकवरून एका फोनवर विद्यार्थ्यांना मदत मिळाल्याने पालकांनी शरद पवार यांचे आभार मानले.

सांगलीतील जत तालुक्यातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी मणिपूर येथे राहत आहेत. जत तालुक्यातील आवंडी गावामधील संभाजी कोडग यांचा मुलगा मयूर मणिपूर येथे शिक्षण घेत आहे. मणिपूर येथे हिंसाचार सुरु झाल्यानंतर त्याने तेथून वडिलांना फोन केला. आजुबाजुला गोळीबार सुरु आहे. बॉम्बस्फोट होत आहेत. आम्हाला वाचवा. कादाचित हा माझा शेवटचा फोन असेल, असे मयूरने वडिलांना सांगितले. यामुळे ते अस्वस्थ झाले. त्यांनी बारामतीचे प्रल्हाद वरे यांच्याशी संपर्क साधला. आयआयटीचे शिक्षण घेणारी महाराष्ट्रातील काही मुले मणिपूर येथील हॉस्टेलमध्ये अडकली आहेत. त्यांना वाचवा, अशी विनंती संभाजी यांनी प्रल्हाद वरे यांना केली. ५ मेरोजी शरद पवार यांंना भेटायला जाऊ, असे वरे यांनी संभाजी यांना सांगितले. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत होती. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने निरोप पोहोचवण्याची विनंती संभाजी यांनी वरे यांना केली.

वरे यांनी तातडीने शरद पवार यांचे खासगी सचिव सतिश राऊत यांच्याशी संपर्क साधला. राऊत यांनी परिस्थिती समजून घेतली. राऊत यांनी तत्काळ सर्व माहिती शरद पवार यांना दिली. शरद पवार यांनी मणिपुरच्या राज्यपालांना फोन केला. महाराष्ट्रातील दहा मुलांसह अन्य राज्यातील दोन मुलांना सुरक्षितस्थळी हलवण्यास सांगितले. मुलांचा सर्व तपशील शरद पवार यांच्या कार्यालयाकडून मणिपूरला पाठवण्यात आला. लगेचच सुत्र फिरली आणि मणिपूरच्या लष्कर प्रमुखाचा मयूरला फोन आला. आमचे पथक तुम्हाला सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हॉस्टेलवर येत आहे, असे मयूरला सांगण्यात आले. त्यानंतर १२ मुलांना लष्कराच्या छावणीत हलवण्यात आले. शरद पवार यांच्या फोनमुळे मुलांना मदत मिळाल्याने संभाजी व अन्य पालकांनी त्यांचे आभार मानले.

मणिपूरमधील हिंसाचार दिवसेंंदिवस वाढतच आहे. तेथे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकल्याने चिंतेचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थींशी संवादही साधला आहे.