घरताज्या घडामोडीकाँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला; 'सामना'तून ठाकरे गटाचा हल्लाबोल

काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला; ‘सामना’तून ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'सामना'च्या अग्रलेखातून कॉंग्रेसवर हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाने मित्रपक्ष काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसच्या नव्या पिढीला इतिहास कळत नसल्याचे म्हटले आहे.

वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’च्या अग्रलेखातून कॉंग्रेसवर हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाने मित्रपक्ष काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसच्या नव्या पिढीला इतिहास कळत नसल्याचे म्हटले आहे. ‘काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे’, अशा शब्दांत ‘सामना’तून टीका करण्यात आली आहे. (Shiv sena uddhav balasaheb thackeray party slams congress in saamana on veer savarkar)

काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे. काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. आताही महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या राहुल गांधीकृत अपमानावर संताप व्यक्त केला. सावरकरांच्या अपमानाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. आम्हीही यासंदर्भातील आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे, पण फडणवीसांच्या संतप्त भावना खऱया आहेत काय? राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या सुरू आहे. त्या यात्रेदरम्यान तीन दिवसांपूर्वी कर्नाटकातील तिरुवेकरे येथे पत्रकारांशी बोलतांना राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर आरोप केले.

- Advertisement -

‘स्वातंत्र्ययुद्धात सावरकर हे इंग्रजांसाठी काम करीत होते. त्याचा त्यांना इंग्रजांकडून मोबदलाही मिळत होता,’ असे ते म्हणाले. राहुल गांधी यांचे सावरकरांवरील असे आरोप धक्कादायक असले तरी नवीन नाहीत. तसेच त्यानिमित्ताने भाजपवाल्यांना येणारे सावरकरप्रेमाचे उमाळेही नवीन नाहीत. राहुल यांच्या या आरोपावरून देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करतील काय?’ असा प्रश्न विचारला. मुळात हातात संपूर्ण सत्ता असूनही ज्यांनी सावरकरांचा योग्य सन्मान केलेला नाही, त्या भाजपवाल्यांना असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? अंदमानातील प्रदीर्घ काळय़ा पाण्याच्या कारावासानंतर वीर सावरकर हे इंग्रजांची माफी मागून सुटले, असा ‘खुळखुळा’ काँग्रेसवाले अनेक वर्षे वाजवीत आहेत.

काँग्रेसवाल्यांची स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतिकारकांसंदर्भात वेगळी भूमिका असू शकते, पण सशस्त्र क्रांतीचा उठाव वीर सावरकरांसारख्या अनेक योद्धय़ांनी केल्याने इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकली. फक्त अहिंसेचा पुरस्कार करून स्वातंत्र्य मिळाले नाही हा इतिहास काँग्रेसमधील नव्या पिढीने समजून घेतला पाहिजे. श्री. फडणवीस म्हणतात, राहुल गांधी यांना इतिहास माहीत नाही. फडणवीसांचे म्हणणे वादासाठी खरे मानू या, पण भारतीय जनता पक्षाला तरी स्वातंत्र्य लढय़ातील वीर सावरकर आहेत? ते कळले असते तर सावरकरांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी नक्कीच पावले उचलली असती. सावरकरांचा मानसन्मान राहावा यासाठी दिल्लीतील मोदी सरकारने काय केले? गेल्या आठ वर्षांपासून वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिवसेना करीत आहे.

- Advertisement -

सावरकरांच्या विचारांचे सरकार आले आहे असे म्हणायचे, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे बोलायचे, पण ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होताच तोंडे लपवायची हेसुद्धा तितकेच संतापजनक आहे. सावरकर हा भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायचा आणि चघळायचा विषय झाला आहे. मोदी सरकारने दिल्लीचे रूपडे पालटायचा चंग बांधला आहे. आताच राजपथाचे नामांतर ‘कर्तव्यपथ’ केले व त्याचा भव्य सोहळा पार पडला. त्याऐवजी ‘वीर सावरकर कर्तव्यपथ’ असे नाव देऊन आम्ही सावरकरांच्या मार्गाने कर्तव्यपथावरून पुढे जात आहोत हे जगाला दाखवता आले असते, पण नेहमीप्रमाणेच सावरकरांचा विसर पडला. कर्तव्यपथावर नेताजींचा भव्य पुतळा उभारला तसा वीर सावरकरांचा पुतळा उभारायलाही हरकत नव्हती.

आम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी नितांत आदर आहे. सरदार हे खरेखुरे लोहपुरुष होते. त्यांच्यामुळेच निजामशाहीचा अंत झाला, पण सावरकरांच्या कार्याची, क्रांतीची, त्यागाची उंचीही कमी नाही. या ‘क्रांती’ची यादगार आठवण म्हणून नेताजी बोस, सरदार पटेलांच्या तोडीस तोड उंचीचा सावरकरांचा पुतळा का उभारला नाही? राहुल गांधींनी काही वक्तव्य केले की, भाजपवाल्यांना सावरकरांचे स्मरण होते. इतर वेळी मात्र कोण सावरकर आणि कसला त्यांचा विचार! सगळेच गुंडाळून ठेवले जाते. पुन्हा महाराष्ट्राच्या ‘मिंधे’ मुख्यमंत्र्यांकडून तर ही क्रांती किंवा सावरकरांबाबत काही घडण्याची शक्यता अजिबातच नाही. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हीच त्यांच्यासाठी ‘क्रांती’ आहे! त्यासाठी जमेल तसे त्यांचे हिंदुत्वाच्या नावाने टाळ-चिपळय़ा वाजवणे सुरू आहे. मात्र भाजपवाल्यांना तरी खरे सावरकर, त्यांचे विज्ञानवादी हिंदुत्व कळले आहे काय? सावरकरांनी आपल्या आयुष्यात ज्या राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक, आर्थिक विचारप्रणालीचा पुरस्कार केला, त्याची चिकित्सक पद्धतीने त्यांनी जी सुसंगत मांडणी केली आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे जी आचरणात आणली, त्या विचारांचा अभ्यास सर्वात आधी भाजपने व नंतर काँग्रेसने केला पाहिजे.

तथाकथित माफी प्रकरणाचा रिकामा खुळखुळा वाजवत बसण्यापेक्षा सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राचा विचार, हिंदुत्वाबाबत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांचा सैनिकीकरणावरील भर, त्यांचे सामाजिक कार्य यावर देशातील प्रत्येक विद्यापीठात ‘चेअर’ म्हणजे ‘अध्यासन’ असायला हवे. सावरकरांना परकीय जोखडातून मातृभूमीची मुक्तता हवी होती. मग त्यासाठी मरण पत्करावे लागले तरी बेहत्तर! ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ याच भावनेतून त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी ‘शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी प्रतिज्ञा केली. त्या प्रतिज्ञापूर्तीसाठी आयुष्यभर जिवाचे रान केले. सावरकरांच्या मते देशाची संरक्षणसिद्धता नुसतीच संरक्षक असून चालत नाही, तर ती आक्रमणक्षम असावी लागते. तरच संरक्षक आणि सुरक्षित ठरते. फक्त घोषणा आणि सोशल मीडियाच्या जोरावर अशी संरक्षणसिद्धता निर्माण करता येत नाही.

सावरकरांचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे लाल चीन हिंदुस्थानच्या सीमा कुरतडत आहे याविषयी सतत धोक्याच्या सूचना दिल्या. शंभर वर्षांनंतरच्या पिढीला जेव्हा कळेल की, पाकिस्तान निर्मितीची भयघंटा वाजवणारी आणि चिन्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका म्हणून घसाफोड करणारी स्वातंत्र्यवीर सावरकर नावाची एक व्यक्ती या देशात दीपस्तंभाप्रमाणे ठाम उभी होती, तेव्हा त्यांना प्रश्न पडेल की, या व्यक्तीवर बदनामीची चिखलफेक का केली गेली? या व्यक्तीकडे हिंदुस्थानी समाजाने दुर्लक्ष का केले? सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळय़ात जास्त अपमान केला.


हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 6 अज्ञातांकडून ट्रक चालकाला मारहाण; 1.3 कोटी रुपयांची सिगारेट लंपास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -